कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभेत नुकतेच एका प्रश्नाला उत्तर देत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आली आहे.
त्यांना पुढील काळात कर्ज घेण्यासाठी फेरफाट होऊ नये, अशा शेतकऱ्यांना सहजरीत्या कर्ज मिळावे, यासाठी बँकांना सूचना करण्यात येणार आहेत. विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना अजितदादा यांनी सांगितले की, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बँकांना सूचना करण्यात येतील तसेच ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन राशी देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सुमारे 31.71 लाख खातेधारकांना या योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आली आहे. या एवढ्या खातेधारकांना 20,000 कोटी रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 32 लाख 82 हजार पात्र कर्ज खाती आहेत. यापैकी 32 लाख 29 हजार शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफाय करण्यात आले आहे.
मात्र असे असले तरी केवळ 31 लाख 71 हजार खातेधारकांनाचं कर्जमाफी देण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधार व्हेरिफाय केले नसल्यामुळे तसेच काही बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे अद्यापही काही पात्र शेतकर्यांना याचा लाभ दिला गेला नाही अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Share your comments