सोलापूर : राज्य शासनाने या आधीच शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकांनी जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना कर्जवाटपही केले आहे. आता कर्ज मर्यादा वाढविल्याने त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता पीक कर्जाची मर्यादा वाढण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी बँकांना दिल्या आहेत.
जवळपास २६ बँकांनी मागील खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्जवाटप केले आहे. आता रब्बी हंगामाचे कर्जवाटप सुरू आहे. आतापर्यंत केवळ २२ टक्क्यांपर्यंतच कर्ज वाटप करण्यात आले आहे. या महिन्यापर्यंत हे कर्जवाटप आणखी पुढे जाईल, असे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नुकतीच जिल्ह्यातील बँकर्स समितीची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेतला. राज्यस्तरीय बँकर्स कमिटी, कृषी विकास अधिकारी आणि मागील पीकनिहाय कर्ज मर्यादेचा अभ्यास करून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यापुढे पीकनिहाय वाढीव कर्ज मिळणार (प्रति हेक्टर)
पीक यापूर्वी मिळणारे कर्ज नवीन वाढीव कर्ज
डाळिंब १ लाख ३० हजार १ लाख ४४ हजार
द्राक्ष २ लाख १० हजार २ लाख ४५ हजार
उस ९५ हजार १ लाख १५ हजार
खोडवा उस ६५ हजार ७५ हजार
केळी १ लाख ३० हजार १ लाख ४० हजार
फळबाग ४० हजार १ लाख
शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा अंदाज, यावरून जिल्ह्यातील पीककर्जाची मर्यादा ठरवण्यात येते. पण, गेल्या काही वर्षांतील या परिस्थितीचा विचार करता मिळणारे कर्ज हे तोकडे आहे. शिवाय, पीक विमा उतरवरवूनही शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा वाढवली आहे.
Share your comments