भंडारा : बँकांकडून कर्ज भेट नसल्याने बळीराजा हैरान झाला आहे. अजूनही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांची रोवणीची वेळ असून कर्ज मिळाले नाही ही गंभीर बाब आहे. कर्ज वाटपात सहकार क्षेत्राच्या तुलनेत राष्ट्रीकृत बँकांचे उद्दिष्ट फारच कमी आहे. शेतकऱ्यांना याचवेळी पैशाची गरज असते ते मिळणार नाही तर शेतकऱ्यांचा हंगाम कसा होईल. शासनाने राष्ट्रीयकृत बँकेतील कर्ज वाटपाचा निधी सहकारी बँकेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकेतील निधी जिल्हा सहकारी बँकेत वळता करुन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी, खरीप हंगाम, पिकविमा व पिक कर्ज वितरण संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंचन विभागाने प्रकल्पात जास्तीत जास्त पाण्याचा साठा कसा होईल यावर युद्ध स्तरावर काम करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. अपूर्ण कालव्याच्या कामास गती देऊन भूसंपादनाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करुन प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या, आपसी समझोता करुन जमिनीचे अधिग्रहण करा, असे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील भटक्या समजातील लोकांना रेशनकार्ड अभावी धान्य मिळत नसल्याने त्यांना राशन कार्ड देऊन मोफत धान्य कसे देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्या. उपेक्षितांना मोफत धान्य कसे देता येईल यावर धोरण ठरवा. त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
Share your comments