शेतीक्षेत्राचा विकास व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अनेक योजनांची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये किंवा थेट आर्थिक मदत करण्यात येते. शेतीच्या बाबतीत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता विजेची उपलब्धता देखील महत्त्वाचे असते.
परंतु जर आपण विजेच्या बाबतीत विचार केला तर विजेच्या लपंडावाची समस्या किंवा कमी दाबाने वीजपुरवठा या समस्या सातत्याने शेतकऱ्यांना येत असतात. त्यामुळे आता भविष्यकालीन गरज ओळखून सौर ऊर्जेचा वापर खूप महत्त्वाचा ठरणार आहे व या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याकरिताच शासनाच्या अनेक योजना असून यामधीलच पीएम कुसुम योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. योजनेच्या माध्यमातून सौर उर्जेवर चालणारे सौर पंप शेतकऱ्यांना देण्यात येतात व यावर अनुदान देखील मिळते.
पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे सौर पंप अनुदानावर दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकार 90% पर्यंत अनुदान देखील देते. यामध्ये केंद्र सरकारचा 30 टक्के आणि राज्य सरकारचा 30% इतका वाटा असून इतर वित्त संस्थांच्या माध्यमातून 30 टक्क्यांची रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते.
म्हणजेच साधारणपणे विचार केला तर यामध्ये दहा टक्के शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा भरावा लागतो. या माध्यमातून वीज असली किंवा नसली तरी सौर पंपांच्या माध्यमातून शेतीला हि वेळेत पाणीपुरवठा त्यावर करता येतो व उत्पादनात देखील वाढ होते.
वीज विकून शेतकऱ्यांना मिळवता येईल अतिरिक्त उत्पन्न
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या सौर पंपाचा उपयोग करून शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देता येईल हा एक मोठा फायदा आहे परंतु या माध्यमातून वीज निर्मिती देखील करता येऊ शकते. योजनेच्या माध्यमातून डिझेल व विजेवर चालणाऱ्या सिंचन पंपांना सौर पंपामध्ये रूपांतरित करता येते
आणि यातून जी काही वीज शिल्लक राहते ती वीज वितरण कंपनींना देखील विकता येते. बरेच शेतकरी बोरवेल मधील पाणी उपसाकरिता विद्युत विद्युत पंपाचा वापर करतात. परंतु या योजनेच्या माध्यमातून विद्युत पंपाचे रूपांतर सौर पंपात करता येते व कमी पैशांमध्ये शेतकऱ्यांना जास्त सुविधा मिळतात.
या योजनेसाठी पात्रता
या योजनेकरिता प्रामुख्याने अर्ज करणारे व्यक्ती ही भारताचे रहिवासी असणे गरजेचे असून शेतकरी, शेतकरी गट तसेच सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संघटना इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येणार असून प्रति मेगा वॅटनुसार शेतकऱ्याजवळ दोन हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. तसेच सर्व प्रकारचे कागदपत्र उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. कागदपत्रांचा उल्लेख केला तर यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड तसेच रेशन कार्ड, नोंदणीची प्रत तसेच अधिकृततापत्र, जमीन कराराची प्रत आणि मोबाईल नंबर, बँक खाते विवरण आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो.
अर्ज कुठे करता येईल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. साधारणपणे तुमच्या जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकतात.
Share your comments