परभणी: आज शेतमाल केवळ पिकविणे महत्वाचे नसुन तो विकता आला पाहिजे तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकरी हा व्यावसायिक झाला पाहिजे. शेतीतील निविष्ठांची खरेदी, पिकांची लागवड, शेतमालाची प्रतवारी आणि शेतमालाची विक्री आदी सर्व कामे एकटा शेतकरी करून शकत नाही, यासाठी शेतकरी गट स्थापन करा, आज शासनाच्या अनेक योजना यासाठी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्या, असे प्रतिपादन प्युअर ऑरगॅनिक ग्रुपच्या अध्यक्षा तथा यशस्वी महिला शेतकरी सौ. स्वाती शिंगाडे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता सेंद्रीय शेतीवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक 28 ते 30 नोव्हेबर दरम्यान परभणी जिल्हयातील शेतक-यांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 28 नोंव्हेबर रोजी आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर रायपुर (छत्तीसगड) येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल दिक्षीत, प्रगतशील शेतकरी एड. गंगाधरराव पवार, श्री. सोपानराव अवचार, प्रभारी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. स्वाती शिंगाडे पुढे म्हणाल्या की, सेंद्रिय शेती करतांना अनुभवातुन आपण शिकले पाहिजे. सेंद्रिय शेतीमालाबाबत ग्राहकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे असुन त्याकरिता सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणिकरण महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती करतांना हळुहळु शेतीतील रासायनिक खत व किडकनाशकांचा वापर कमी करा. सेंद्रिय शेती कडे हळुहळु पर्यायी शेती म्हणुन वळा, असा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, सेंद्रिय शेती की रासायनिक शेती यावर अनेक वादविवाद झाले. आज रासायनिक खत, किटकनाशकांचे दुष्परिणाम मानवाच्या आरोग्यावर व पर्यावरणावर दिसत आहेत, त्यामुळे सेंद्रिय शेतीही संकल्पना लोकांमध्ये रूढ होत आहे, त्यास आता शासनही प्रोत्साहन देत असुन कृषि विद्यापीठही संशोधनाची जोड देत आहे म्हणजेच सेंद्रिय शेतीला लोकांचा लोकाश्रय, शासनाकडुन राजाश्रय तर विद्यापीठाकडुन ज्ञानाश्रय मिळत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती एक पर्याय म्हणुन पुढे येत आहे. पर्यायी उत्पादन व्यवस्था म्हणुन सेंद्रिय शेती विकसित होत आहे. सेद्रिय शेती करतांना आपणास शिकत शिकत पुढे जावे लागेल. आपणास अनुभवातुन शहाणे व्हावे लागेल. सेंद्रिय शेतीतील निविष्ठा या शेतकऱ्यांनी स्वत: निर्माण केल्या पाहिजे व शेतमालाचे विपणन तंत्र शिकले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शनात डॉ. अनिल दिक्षित म्हणाले की, सेंद्रिय शेतीचे अनेक पध्दतीत आहेत. शास्त्रीय आधारावर सेंद्रिय शेती तंत्रज्ञान सिध्द झाले पाहिजे. सेंद्रिय शेतीतील प्रमाणिकरण केलेल्या दर्जेदार शेतमालास मोठी किंमत भेटली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी एड गंगाधरराव पवार व सोपानराव अवचार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. आर एन खंदारे यांनी मानले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. ओंमकार शिंदे, श्री. नरेश शिंदे, श्री. रमेश चाकणकार आदींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रशिक्षणार्थी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
फौजदारी ते यशस्वी महिला शेतकरी सौ. स्वाती शिंगाडे यांचा अल्प परिचय
सौ. स्वाती शिंगाडे या राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कृषी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी असुन त्यांची 2006 साली पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन शेतीक्षेत्राकडे वळाल्या. बारामती परिसरात माळरानावरील पडीक केवळ साडेतीन एकर शेती पासुन सुरूवात करून आज तब्बल 55 एकर शेती त्या कसतात. हायटेक शेती, पॉलिहाऊस मधील फुलशेती व भाजीपाला त्या पिकवतात. तसेच सेंद्रिय शेती करून प्युअर ऑरगॅनिक नावाच्या ब्रँडने विक्री करतात. तसेच विदेशातही त्याचा माल विक्री होतो. आज त्यांनी अनेक शेतकरी गट स्थापन करून एकत्र जोडले आहेत. शासकीय नौकरी सोडुन शेतीत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केले असुन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट भारतीय महिला किसान पुरस्कारांनी सन्माननित करण्यात आले आहे.
परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता सदरिल प्रशिक्षण दिनांक दिनांक 28 ते 30 नोव्हेबर दरम्यान होणार असुन हिंगोली जिल्हयासाठी 2 ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हयातुन शंभर शेतकऱ्यांना यात प्रशिक्षीत करण्यात येणार असुन संबंधित जिल्हयाचे आत्मा (कृषी विभाग) प्रकल्प संचालक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कडुन संयुक्तपणे 80 व संबंधित जिल्हयातील कृषि विज्ञान केंद्र व थेट विद्यापीठ यांच्या माध्यमातुन प्रत्येकी दहा शेतकऱ्यांनी निवड करण्यात आली आहे. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञ, देशातील व राज्यातील सेंद्रीय शेतीतील शास्त्रज्ञ व तज्ञ शेतकरी सेंद्रीय पिक लागवड तंत्रज्ञान, जैविक कीड व्यवस्थापन, जैविक रोग व्यवस्थापन, सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय बाजारपेठ, व सेंद्रीय शेतकरी यशोगाथा अशा विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
Share your comments