परभणी: देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला, अन्नसुरक्षेचे उदिष्टे साध्य केले. परंतु पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी फळ व भाजीपाला उत्पादनावर भर द्यावा लागेल. देशातील शेतीक्षेत्राचा विकास दर दोन टक्केच्या आसपास आहे, तर फळे व भाजीपाला उत्पादन विकास दर पाच टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार भारतीय लोकांचे दरडोई आहारातील फळांचा समावेश कमी असुन देशातील 60 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे, त्यामुळे अन्न पोषणासाठी आपणास फळपिक लागवडीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. डब्ल्यु. एस. धिल्लन यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत असलेल्या बिकानेर (राजस्थान) येथील कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरडवाहू फळे संशोधनाच्या राष्ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन दि. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते कार्यशाळेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते तर बिकानेर येथील कोरडवाहू फळे संशोधन संस्थेचे प्रभारी प्रकल्प समन्वयक डॉ. बी. डी. शर्मा, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री. रणजित पाटील, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गोविंद मुंडे, प्रगतशील शेतकरी श्री. कांतराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. डब्ल्यु. एस. धिल्लन पुढे म्हणाले की, देशातील व विदेशातील बाजारपेठेत दर्जेदार फळांची मोठी मागणी आहे. फळ पिकांतील विविध वाण निर्मितीसाठी दिर्घ संशोधन कालावधी लागतो, जलद संशोधनाची गरज असुन फळ पिकांतील वाण चाचणीचा कालावधी कमी करावा लागेल. उच्च प्रतीच्या व दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या फळा पिकांच्या खुंटाचा शोध घ्यावा लागेल. देशात फळाच्या काढणी पश्चात साधारणत: 30 टक्के नासाडी होते, त्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधनाची मोठी गरज आहे. जे काही तंत्रज्ञान विकसित आहे, ते फळ उत्पादकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्हणाले की, मराठवाडयात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी कोरडवाहु फळपिके सिताफळ, डाळींब, बोर, आवळा आदी लागवडीकडे वळत आहेत. फळ लागवडीतुन मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यात रोपवाटीका, काढणी पश्चात प्रक्रिया, फळ प्रक्रिया उद्योग आदीसाठी मोठया मनुष्यबळाची आवश्यकता लागते. फळ लागवडीच्या माध्यमातुन पोषण सुरक्षे सोबतच शेतकरी उपजीविका सुरक्षाही साध्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे आपल्या भाषणात म्हणाले की, देशात व राज्यात शेती ही मुख्यत: कोरडवाहुच असुन कोरडवाहु फळ पिकांच्या उत्पादन वाढीतुन देशात दुसरी हरितक्रांती साध्य करू शकु. तर डॉ. बी. डी. शर्मा आपल्या भाषणात म्हणाले की, देशातील डाळिंब लागवडी क्षेत्रापैकी 80 ते 85 टक्के क्षेत्र हे राहुरी कृषी विद्यापीठ विकसित भगवा जाती खाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत देशातील कोरडवाहू फळे संशोधनाशी निगडीत मध्यप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडु, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील अठरा संशोधन केंद्रातील 70 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ सहभागी झालेले असुन प्रगतीशील शेतकरीही सहभागी होते. सदर कार्यशाळेत विविध तांत्रिक चर्चासत्रात संशोधनाचे निष्कर्ष सादर करण्यात आले असुन वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा व पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्यात आली.
Share your comments