Amravati News
अमरावतीमधील संत्रा उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहेत. फळगळती झालेला संत्रा शेतकऱ्यांनी नदीकाठी फेकून दिला आहे. फळगळतीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार? असा संतप्त सवाल आता शेतकरी करत आहेत.
खराब झालेली संत्री शेतकऱ्यांनी नदीकाठी फेकून दिल्या आहेत. कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे देखील केले जात नाहीत. फळगळतीमुळे झाडाचे संपूर्ण फळे गळत आहेत. यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत देखील कृषी विभाग मार्गदर्शन करत नाही, असा आरोप देखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. कृषिमंत्री अजितदादाची सभा घेण्यात आणि त्यांचे स्वागत करण्यात व्यस्त असतात, असा आरोप देखील बीडच्या सभेवरुन शेतकऱ्यांनी केला आहे. कृषिमंत्र्यांनी संत्रा बागेच्या नुकसानीची पाहणी करावी, असं देखील शेतकरी म्हणत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्राचे उत्पादन घेतलं जाते. विदर्भामध्ये तब्बल ९८ लाख हेक्टरवर संत्र्याच्या बागा आहे. परंतु संत्रा उत्पादक शेतकरी आता फळगळीतीमुळे मेटाकुटीला आले आहेत. सध्या अंबिया बहारातील संत्रा फळ झाडाला लागले आहेत.
दरम्यान, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बाग हाताच्या तळहाताप्रमाणे जपल्या आहेत. तसंच बागेला हेक्टरी लाखो रुपये खर्च केला आहे. पण सध्या फळगळती सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत सापडले असताना दुसरीकडे कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथिल शेतकऱ्यांनी केला आहे.
Share your comments