गतवर्षी अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट तसेच शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर या अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे शेतकरी राजा पूर्ण हतबल झाला होता. या नववर्षात तरी हे संकटे शेतकरी राजांचा पिच्छा सोडतील अशी आशा होती मात्र ही आशा आता फोल ठरताना दिसत आहे. नववर्षात देखील शेतकरी राजांना सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते यांचे प्रकरण समोर आले आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव संत्रा लागवड करतात विशेषता या जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी हा तालुका संत्र्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या तालुक्याला संत्रा बागायतदारांचा तालुका म्हणून संबोधले जाते. अंजनगाव सुर्जी तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आंबिया बहार पकडण्यासाठी सर्वत्र धावपळ बघायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना कुठलाही पिकाच्या विकासासाठी खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते म्हणून तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आंबिया बहराच्या संत्रा बागेसाठी खतांची आवश्यकता भासत आहे. अनेक संत्रा उत्पादक शेतकरी डीएपी या रासायनिक खतासाठी कृषी केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र या संपूर्ण तालुक्यातील कृषी केंद्राच्या चालकांचा मनमानी कारभार आता उघड पडत आहे. आधीच डीएपी खताची तालुक्यात मोठ्या प्रमाणात टंचाई बघायला मिळत आहे आणि याचाच फायदा आता अनेक कृषी केंद्र चालक उचलताना दिसत आहेत. अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांवर अनावश्यक खत खरेदी करण्याची बळजबरी होताना दिसत आहे.
या प्रकरणात हाती आलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेतकरी बांधव डीएपी खत खरेदी करण्यासाठी जेव्हा कृषी केंद्रावर जातात, तेव्हा त्यांना डीएपी समवेतच एक अनावश्यक खताची गोणी खरेदी करण्याची बळजबरी केली जात आहे. तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांवर दिवसाढवळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची लुटमार सुरू आहे. अंजनगाव सुर्जी तालुका हा एक सधन तालुका आहे या तालुक्यात तिन्ही हंगामात शिवार हिरवेगार नजरेला पडते, त्याचे कारण म्हणजे हा तालुका बागायती पिकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या तालुक्यात तालुक्याचे मुख्य फळपीक संत्रा बागेचा आंबिया बहार व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा आटापिटा करताना दिसत आहे, या समवेतच अनेक शेतकरी गहू हरभरा कांदा या नगदी पिकांच्या वाढीला लागणाऱ्या खतासाठी धावपळ करत आहे. तालुक्यात बऱ्याचशा कृषी केंद्रावर गेल्या अनेक दिवसापासून खतांची टंचाई बघायला मिळत आहे तालुक्यात प्रामुख्याने डीएपी खताची टंचाई निदर्शनास येत आहे. तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून डीएपीची मागणी वधारलेली बघून काही सधन व माजोरी कृषी केंद्र चालकांनी डीएपीचा मोठा साठा करून ठेवला आहे. आणि आता हे डीएपी खत विक्री करताना त्या समवेत एका अनावश्यक खताची गोणी देखील खरेदी करण्याची बळजबरी शेतकऱ्यांना केली जात आहे. म्हणजे डीएपी खत दुसऱ्या खतासोबत लिंकिंग करून विकले जात आहे.
शेतकऱ्यांना डीएपीची गरज असल्याने त्यांना दुसरे खत गरजेचे नसताना देखील खरेदी करावे लागत आहेत. एकंदरीत शेतकरी राजावर विनाकारण अधिकचा पैसा खर्च करण्याची नामुष्की ओढवून आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होतच आहे शिवाय यामुळे एका नागरिकाचे हक्काचे देखील हनन होत आहे. मात्र असे असले तरी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कृषी विभाग प्रेक्षक बनवून या सर्व गोष्टीचा आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रशासनावर कमालीचे संतापलेले दिसत आहेत.
Share your comments