1. बातम्या

चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये मुंबईत होणार

मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र शासन हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

KJ Staff
KJ Staff


जगभरातील पंधराशेहून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती
आयआयटी मुंबईमध्ये होणार परिषद व प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र शासन हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेसाठी गठित सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ,आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे (Disaster Management Initiative and Convergence Society) सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई (आयआयटी),डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सहआयोजक आहेत. या जागतिक परिषदेत देशभरातील विविध राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी,आपत्ती निवारणाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, तज्ज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन सुध्दा मांडण्यात येणार आहे.

 

29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोधनिबंध मांडता येणार असून हे शोधनिबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोधनिबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.

डीएमआयसीएसच्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैद्राबाद येथे 2008 मध्ये झाली. त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी परिषद सन 2017 मध्ये विशाखापट्टणम येथे झाली. तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपत्तीतील धोका व्यवस्थापन, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, शाश्वत विकास यामधील आपत्ती व्यवस्थापन ही चौथ्या परिषदेची संकल्पना आहे. आपत्तीची गांभीर्यता, आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी योजलेले नाविन्यपूर्ण संशोधन, कार्ये,आपत्ती काळात तातडीने मदत करणे आदी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेच्या आयोजनासाठी बारा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून मुख्य सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी मदत व पुनर्वसन आहेत.

श्री. पाटील म्हणाले, आपत्ती निवारणामध्ये गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगले काम केले आहे. हे काम जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी या परिषदेची मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरचे विविध देशाचे प्रतिनिधींकडून इतरत्र होत असलेल्या या विषयीच्या कामाचे आदानप्रदान होणार आहे. आपत्तीचे धोके कमी होण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याचे विचारमंथन या परिषदेत व्हावे. परिषदेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल.

श्री. जैन म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये देशभरातील विविध राज्यांचा सहभाग घ्यावा. या राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती उपलब्ध व्हावी. सध्या वातावरणातील बदल हा महत्त्वाचा घटक झाला आहे. वातावरणातील बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांची चर्चा या परिषदेत व्हावी, या दृष्टीने नियोजन करावे.

सुकाणू समितीच्या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे,युनिसेफचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी युसुफ कबीर, मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे मुख्य अधिकारी महेश नार्वेकर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य तथा आयआयटी मुंबईतील प्राध्यापक रवी सिन्हा,टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या प्राध्यापिका जॅकलिन जोसेफ, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे  अनिल गुप्ता,महाराष्ट्र चेंबरचे अरविंद दोशी, सागर नागरे आदी उपस्थित होते.

English Summary: fourth world disaster management congress will be held at mumbai in january Published on: 06 September 2018, 01:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters