सांगली- गेल्या आठवड्यामध्ये राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा फटका हा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला. द्राक्ष आणि डाळिंब या दोन्ही फळपिकांचे नुकसान झाले
या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने विशेष मदत पॅकेज ची घोषणा करून हवामानावर आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी व या योजनेत असलेल्या त्रुटी दूर करून आठ महिने ऐवजी एका वर्षासाठीविमा कवच शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की,सांगली जिल्ह्यातील मिरज, खानापूर, कवठे महांकाळ, जत इत्यादी तालुक्यांमध्ये साठ ते सत्तर हजार एकरांवरील द्राक्ष बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी केलेली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यामध्ये जाणार असल्याने ताबडतोब पंचनामे करण्याची गरज असून सरकारने यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा व शेतकऱ्यांना मदत करावी. पुढे ते म्हणाले की संपूर्ण सांगली जिल्ह्याचा नुकसानीचा आकडा हा साडेचार हजार कोटींचा आहे.
यामुळे विमा योजनेतील काही त्रुटी दूर न केल्यास द्राक्षबागांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सरकारने गांभीर्याने याची दखल घ्यावी तसेच द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी, असे ते म्हणाले.
Share your comments