MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

राज्यात फुलणार वनशेती

मुंबई: राज्यातील 48 हजार 455 शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास 22 लाख 23 हजार 980 फळझाडं व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने वन विभागाने शेतकऱ्यांना वनशेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते, त्यास राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्यातील 48 हजार 455 शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास 22 लाख 23 हजार 980 फळझाडं व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने वन विभागाने शेतकऱ्यांना वनशेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते, त्यास राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

वृक्षलागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, त्यातून सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने नियोजन विभागाने “महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनें”तर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर, शेतजमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन शेती फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. यात अल्पभूधारक म्हणजेच दोन हेक्टर क्षेत्र असणाऱ्या विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

वनशेतीमध्ये साग, चंदन, खाया, बांबू, निम, चारोळी, आवळा, बेहडा, हिरडा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, खैर, शेवगा, हादगा, आंबा, काजू, फणस यासारख्या 31 प्रजातींचा समवेश आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.07 लाख चौ.कि.मी असून राष्ट्रीय वननीतीनुसार राज्यात 93 हजार 248 चौ.कि.मी चे क्षेत्र वनाखाली हवे. आजमितीस ते 61 हजार 570 चौ.कि.मी म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 20 टक्के आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार आवश्यक असलेल्या क्षेत्रापेक्षा ते 31 हजार 248 चौ.कि.मी. ने कमी आहे. राज्याचे वृक्षाच्छादन 33 टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेत तर ते एकट्या वन विभागाच्या जमिनीवर शक्य नाही.

त्यासाठी वनेत्तर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन वाढणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन वन विभागाने वनशेतीला प्रोत्साहन देत त्यातून रोजगार संधी आणि उत्पन्न वृद्धीचा मार्ग विकसित केला असून त्याद्वारे हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. इच्छुक लाभार्थींना वनशेती योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर ते संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकतात, अशी माहितीही  त्यांनी दिली आहे.

English Summary: Forestry will flourish in the Maharashtra Agriculture Published on: 02 August 2019, 08:12 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters