चंद्रपूर: विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच आर्थिक स्तर सुधारण्यासाठी दूध उत्पादनाच्या जोडधंद्याला गंभीरतेने सुरुवात करावी. यासाठी जे. के. ट्रस्टच्यावतीने जिल्ह्यामधील श्वेतक्रांतीला चंद्रपूर जिल्ह्यातील मारोडा येथून सुरुवात करीत आहोत. दूध उत्पादन वाढीसाठी पशुवंश सुधार कार्यक्रम तसेच एकात्मिक पशुधन विकास केंद्राची निर्मिती या अभियानातंर्गत जिल्ह्यात 15 केंद्र सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील मारोडा या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मदतीने जे. के. ट्रस्टच्या मार्फत पशुवंश सुधार कार्यक्रम व एकात्मिक पशुधन विकास केंद्र कार्यक्रमाची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक देशी आणि कमी दूध देणाऱ्या पशुधनाला कृत्रिम रेतनाद्वारे व आधुनिक उपचारामार्फत अधिक क्षमतेच्या दूध उत्पादक पशुधनामध्ये बदलण्यात येते.
भाकड जनावरांना देखील याचा लाभ होणार आहे. देशातल्या 22 राज्यात सध्या हा प्रयोग जे. के. ट्रस्टमार्फत करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 केंद्राला आज मारोडा येथून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, सभापती पूजा डोहणे, वर्षा लोणारे, प्रेमदास गेडाम आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिला व शेतकऱ्यांना संबोधित करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काल पोंभूर्णामध्ये स्वीट क्रांतीला सुरुवात केल्यानंतर आज जिल्ह्यातील श्वेतक्रांतीचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 27 लाख लीटर दुधाचे उत्पादन होते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केवळ 5 हजार लीटर दुधाचे उत्पादन होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे उत्पादनाची जोड शेतीला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी देखील हा बदल आत्मसात करावा.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना डुक्कर व रोही यांच्यापासून होत असलेल्या त्रासाची नोंद घेऊन या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास मोबदला देण्याचा कायदा करीत असल्याची महत्त्वाची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना व्यक्तिगत कुंपणासाठी 75 टक्के अनुदान देण्याबाबतही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Share your comments