1. बातम्या

भविष्यातील शेतीला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही

KJ Staff
KJ Staff


सातारा:
कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव येथे 'कृषि यांत्रिकीकरण दिवस व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद रब्बी मेळावा 2019' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. मोहन शिर्के, कार्यक्रम समन्वयक तर प्रमुख पाहुणे म्हणुन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे हे होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथुन यंत्रे व अवजारे संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास बास्टेवाड हे आवर्जुन उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. सरकाळे यांनी विद्यापीठातील संशोधन प्रत्यक्ष बांधावर गेल्याशिवाय शेतकरी प्रगत होणार नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असुन बोरगांव येथील कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान प्रसारात महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन केले.

अल्पभुधारक शेतकऱ्यांना मजुरांच्या अभावामुळे शेती करणे जिकीरीचे होत आहे. यावर उपाय म्हणुन भाडेतत्वावर अवजारे केंद्र, गटशेती तसेच यांत्रिकीकरण हा एकमेव उपाय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. बास्टेवाड यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे यांत्रिकीकरणात शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप संशोधन करीत असुन त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्याची पार्श्वभुमी सविस्तर सांगितली. यावेळी कृषी अवजारे उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रविण शेळके यांनी कृषी विद्यापीठ व उत्पादक संघटना यांच्या समन्वयाने गरजेनुरुप अवजारे निर्माण करणे सुलभ झाल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्रा. मोहन शिर्के यांनी यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याने असे दिवस साजरे केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हयातील 15 शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोरगांव येथे सुधारित कृषी अवजारे व यंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. तसेच प्रक्षेत्रावरील पिक संग्रहालयात गहु, हरभरा व विविध चारा पिकांच्या वाणांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करुन माहिती देण्यात आली. यावेळी तांत्रिक सत्रात राहुरी येथील प्राध्यापक महेश पाचारणे यांनी विविध यंत्रे व अवजारे यांची माहिती दिली. तसेच पाडेगांव येथील डॉ. दिपक पोतदार यांनी खोडवा ऊस व्यवस्थापन याविषयी तर बोरगांव येथील शास्त्रज्ञ प्रा. भुषण यादगीरवार यांनी भाजीपाला व्यवस्थापन व श्री. संग्राम पाटील यांनी रब्बी पिकातील पाणी व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सातारा जिल्हयातील कृषी संबंधीत अवजारे विक्रेते व उत्पादक उपस्थित राहुन शेतकऱ्यांना अवजारांची प्रात्यक्षिके दाखविली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ. भाग्यश्री मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा श्री. महेश झेंडे, आत्मा साताराचे श्री. विजयकुमार राऊत, राहुरीचे प्रा. विश्वास देशमुख तसेच परिसरातील कृषी अधिकारी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. महेश बाबर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सागर सकटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters