1. बातम्या

सांगली आणि यवतमाळमध्ये सुरु होणार फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय : कृषिमंत्री चंद्रकांत पाटील

KJ Staff
KJ Staff

मुंबई : यवतमाळ व सांगली जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगावर (फूड टेक्नॉलॉजी) आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 (मंगळवार) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला.

यवतमाळ व सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

राज्यात फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमावर आधारित एकमेव महाविद्यालय परभणीमध्ये आहे. त्यामुळे सांगली व यवतमाळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करतानाच अन्न प्रक्रिया अभ्यासक्रमावरील महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन व इतर सोयी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात आता या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू होऊन तरुणांना या क्षेत्रात करियरची संधी निर्माण होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters