मुंबई : यवतमाळ व सांगली जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगावर (फूड टेक्नॉलॉजी) आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 (मंगळवार) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला.
यवतमाळ व सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.
राज्यात फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमावर आधारित एकमेव महाविद्यालय परभणीमध्ये आहे. त्यामुळे सांगली व यवतमाळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करतानाच अन्न प्रक्रिया अभ्यासक्रमावरील महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन व इतर सोयी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात आता या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू होऊन तरुणांना या क्षेत्रात करियरची संधी निर्माण होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
Share your comments