औरंगाबाद: राज्याच्या औद्योगिक विकासाद्वारे उद्योजक आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद बिडकीन येथे पाचशे एकर जमिनीवर 'अन्न प्रक्रिया केंद्र' उभारणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले. औरंगाबाद कलाग्राम, गरवारे संकुल परिसर येथे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) यांच्याद्वारे आयोजित चार दिवसीय 'ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो' या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार इम्तियाज जलील, खासदार राजकुमार धुत, आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, अंबादास दानवे, संजय सिरसाट, सतिश चव्हाण, विक्रम काळे, उदयसिंह राजपुत, प्रा. रमेश बोरनारे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगर पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी आणि उद्योजक यांच्या कष्टाला, दुर्दम्य इच्छाशक्तीला शासनाच्या कृतीशील प्रयत्नाची भक्कम साथ देण्याचा शासनाचा मानस आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करत असतानाच आता शेतकरी हा चिंतामुक्त करण्याची शासनाची भूमिका आहे. उद्योग विकासाद्वारे येथील शेतकरी, भूमीपुत्रांना रोजगार संधी देण्यास, उद्योजकांना सक्षम करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे.
उद्योग आणि कृषी या दोन विभागांच्या समन्वयातून अन्न प्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी निगडीत अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. बिडकीन येथील पाचशे एकर जमिनीवरील अन्न प्रक्रिया केंद्राचे लवकरच भूमीपूजन करून गतीने केंद्र उभारणीचे काम पूर्ण केले जाईल. तसेच या ठिकाणी 100 एकर जमीन ही महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहे. मराठवाड्यात उद्योगक्षेत्रात भरीव प्रमाणात काम होत असून उद्योग विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य शासन स्तरावरून उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
त्या सोबतच राज्यात नवनवीन उद्योग समूह, व्यवसाय संधी विस्तारणार आहे. त्यासाठीचे तयार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शेंद्रा येथे कौशल्य विकास संकुलदेखील उभारणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात आहे. पारंपारिक उद्योग व्यवसायाच्या पुढे जात वेगळा आधुनिक प्रयोग करून जगाला मेड इन इंडियाची ओळख आपण करून देऊ शकतो हा विश्वास देणारे काम मराठवाड्यात होत आहे.
मराठवाड्याची ही औद्योगिक ताकत दाखवणारे हे प्रदर्शन आहे, अशा शब्दांत प्रदर्शनाचे कौतुक करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्या सगळ्यांना दोन घास देणाऱ्या शेतकऱ्याला हवामानाच्या लहरीपणामुळे खूप समस्यांना, अस्थिरतेला सामोरे जावे लागत आहे. त्याला आधार देण्यासाठी, भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी शासन उद्योग विकासाला भरीव चालना देणार आहे. त्यातुन भूमीपुत्रांना रोजगार देणे आणि उद्योग क्षेत्राचा झपाट्याने विकास करणे शक्य होईल. याद्वारे राज्य गतिमानतेने प्रगती करेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, कृषी, जल, उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर करून राज्याला गतीने पुढे नेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे. मराठवाड्याचे, राज्याचे औद्योगिक क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातून अधिक समृद्ध होईल. त्यादृष्टीने मराठवाड्याच्या व्यापक प्रगतीसाठी येथे औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात येत असून लवकरच औरंगाबाद येथे अतिरीक्त शेंद्रा औद्योगिक वसाहत 1 हजार हेक्टर क्षेत्रावर सुरू करणार आहोत. जालना उस्मानाबाद, नांदेड येथील उद्योग विस्तारासाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामालाही अधिक गतिमान करण्यात येणार आहे.
कापसावर आधारीत उद्योग व्यवसाय विस्तारण्यासाठी कापसाची दरवाढ करणार असून उस्मानाबाद येथे टेक्नीकल हब सुरू करणार आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येणार आहे. त्या माध्यमातून 8 हजार 360 कोटी रूपयांची नवीन गुंतवणूक येणार आहे. तसेच उद्योजकांना सेवा शुल्काचा भार वाटणार नाही या पद्धतीने तो कमी केला आहे, असे सांगून श्री.देसाई म्हणाले या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मसिआचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. ऑटो क्लस्टर, रबर क्लस्टर, क्लस्टर डेव्हलपमेंट यासारख्या विविध उपयुक्त उपक्रमातून मसिआ उद्योजकांच्या विकासाला पूरक ठरणारे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. असे श्री.देसाई म्हणाले.
मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे यांनी संघटनेबद्दलची माहिती व उद्योजकांच्या अपेक्षा मनोगतामध्ये व्यक्त केल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उद्योजक, लघुउद्योजक, संबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात साडेचारशेवर उद्योजकांनी उत्पादने मांडली आहेत. औरंगाबाद, मराठवाड्यासह राज्य आणि देशभरातून सहभागी होणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, एनिमेशन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, ट्रेडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, सेवा उद्योग स्वयंसेवी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांची प्रदर्शनात विभागवार रचना करण्यात आलेली आहे. अनेक मोठ्या उद्योगांबरोबरच मध्यम आणि नवोदित उद्योजकही सहभागी झाले आहेत.
Share your comments