नागपूर: केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ फुड प्रोसिसिंग इंडस्ट्रीतर्फे अन्न प्रक्रिया उद्योगातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी 100 दिवसीय आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘एमएसएमई’चे मिशन मोडवर काम सुरु करण्यात आले असल्याचे प्रतिपादन पेयजल व स्वच्छता विभागाच्या सहसचिव व्ही. राधा यांनी केले. मिनिस्ट्री ऑफ फुड प्रोसेसिंग इंडस्ट्री व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)च्या वतीने अन्न प्रक्रिया उद्योगावरील विविध जनजागृती कार्यक्रमाच्या परिसंवादात मार्गदर्शन करताना व्ही. राधा बोलत होत्या.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी गृहोद्योगापासून सुरुवात करावी लागणार आहे. महिला आणि युवकांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरु करता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमात देशातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. महिला आणि युवकांनी याचा लाभ घ्यावा. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु असल्याचे श्रीमती व्ही. राधा यांनी सांगितले.
अन्नावर प्रक्रिया करुन त्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करता येते. अन्नावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन दर्जाच्या संवर्धनातून उत्पादकांना अधिकचे मूल्य मिळते. त्यासाठी उत्पादनाची चांगली पॅकेजींग करणे आवश्यक आहे. केंद्र शासन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, ते मिशन मोडवर काम करत आहे. त्यामुळे शासन अशा उद्योजकांसाठी मदत करण्यास तत्पर असून, ते उदयोन्मुख उद्योजकांच्या आणि नव्याने उद्योग व्यवसायात येऊ इच्छिणारांच्या दारापर्यंत आले आहे. तसेच भविष्यातही उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी 59 मिनिटांमध्ये वित्तीय मदत करण्यास तयार आहे. त्यासाठी देशातील बँकाचाही सहभाग असल्याचे श्रीमती व्ही. राधा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दलित उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून, सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. एस.सी, एस. टी.च्या उद्योजकांना सहज आणि सुलभ वित्तपुरवठा व्हावा, यासाठी जवळपास 15 पेक्षा जास्त बँका वित्तपुरवठा करण्यास तयार आहेत. यापूर्वी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सहायक महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, भारतीय खाद्यान्ने प्रक्रिया केल्यास उद्योजकांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण करुन देऊ शकतात असे श्री. लोहकरे बोलत होते.
हा परिसंवाद बानाई हॉल, उर्वेला कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सहायक महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, विदेश व्यापार अधिकारी रामेश्वर बोरीकर, बँक ऑफ बरोडाचे व्यवस्थापक स्वप्निल देशमुख, डिक्कीचे विदर्भ अध्यक्ष गोपाल वासनिक आदी उपस्थित होते.
Share your comments