नाशिक: राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी अधिकाधीक क्षेत्रावर चारा लागवड करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. गंगावऱ्हे येथे जलाशय व तलावाखालील जमिनीवर (गाळपेरा क्षेत्रावर) चारा पिके लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, पं. स. सभापती रत्नाकर चुंबळे, आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाला असल्याने मोकळ्या झालेल्या जमिनी चारा पिकांच्या लागवडीकरिता सर्वात उपयुक्त आहेत. गाळपेरा जमिनीवर पीकाची पेरणी करण्यात येते. पेरणीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत देण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गाळपेरा जमिनीवर ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे उत्पादन घेतले जाईल व या पिकातून निर्माण होणारा चाऱ्याचा फायदा जनावरांना होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते बाजरी व मक्याचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करून चारा पिके लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, तसेच चारा साक्षरता रथाचेदेखील उद्घाटन करण्यात आले.
गाळपेरा लागवडीसाठी जि.प. अंतर्गत 418 आणि जलसंपदा विभागांतर्गत 984 अर्ज प्राप्त झाले आहेत. गंगावऱ्हे व सावरगाव येथील 145 शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात 1200 हेक्टरवर चारा लागवड करण्यात येणार आहे.सरासरी 50 मे. टन प्रति हेक्टर चारा उत्पादन असल्यास एकूण 1850 मे. टन अतिरिक्त हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. टंचाई जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून न्युट्रीफाईड बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 10 जानेवारीपर्यंत चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
उत्पादित केलेला चारा शेतकऱ्यांनी स्वत: वापरायचा असून उर्वरीत चारा शिवारातील इतर शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे. जिल्ह्याला चारा उत्पादनासाठी 371 क्विंटल बियाणे प्राप्त झाले असून त्यात मका 175 क्विंटल, ज्वारी 140, बाजरी 42, न्युट्रीफीडचे 14 क्विंटल बियाणे आहे.
Share your comments