आज नवीन वर्षातला (new year) पहिलाच दिवस पण 2022 या नूतन वर्षात देखील शेतकऱ्यांच्या चिंतेत घट होताना दिसत नाहीये, उलट अजूनच यात भर पडताना दिसत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते, खरीप हंगामात अतिवृष्टी, तर रब्बी हंगामात अवकाळी (Untimely Rain) आणि गारपीट (Hailstorm) यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. शेतकरी राजा हे सर्व विसरून कसाबसा रब्बीच्या पिकांची (Rabi Crops) जोपासना करताना दिसत होता आणि त्याला आशा होती की निदान येणारे नवीन वर्षे तरी हे सुखाचे जाईल आणि अस्मानी आणि सुल्तानी संकटाना कुठेतरी पूर्णविराम लागेल. पण असे होताना काही दिसत नाही, याउलट नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे.
आधीच लालकांदा पिकाचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे उत्पादनात (Production) लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशी आशा होती की निदान कांद्याला चांगला बाजारभाव (Market price) मिळेल त्यामुळे उत्पादनाची कसर ही बाजारभावातन आपल्याला काढता येईल, मात्र शेतकऱ्यांच्या या आशेवर कांद्याच्या दराने पाणी फेरलेले दिसत आहे. कारण की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या दरात मोठी कपात झाल्याचे समोर आले आहे.
परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याला अवघा दोनशे रुपये क्विंटल कमीत कमी दर मिळाला, तसेच जास्तीत जास्त दर 3398 असला तरी मात्र सर्वसाधारण दर हा फक्त पंधराशे रुपये क्विंटल एवढाच होता शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंढरपूर बाजार समितीत अवघी 511 क्विंटल आवक झाली होती, तरीदेखील बाजारभावात कमालीची घसरण बघायला मिळाली. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेले नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे दर हे चांगलेच खालावलेले दिसत आहेत
लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत नवीन लाल कांद्याला हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला तसेच 2180 एवढा जास्तीत जास्त दर यावेळी बाजार समितीत बघायला मिळाला, असे असले तरी लासलगाव बाजार समितीमध्ये देखील सर्वसाधारण दर हा फक्त 1700 रुपये प्रति क्विंटल एवढाच होता. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठ कांद्याचे भाव ठरवण्याचे प्रमुख सूत्रधार मार्केट म्हणून कार्य करत असते. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत खालावलेले कांद्याचे भाव बघून शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे काहूर घर करू लागले आहे.
Share your comments