मुंबई : केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.
सध्या गरीब परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंना योग्य ती मदत करणे, खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत आणि स्पर्धांदरम्यान झालेल्या दुखापतीच्या स्वरूपानुसार योग्य सहाय्य प्रदान करणे; खेळाडूंना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे; खेळाडू व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबिय यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणे. गरीब परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य खरेदी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग इत्यादीसाठी मदत करणे या बाबींचा या योजनेत समावेश असेल.
या बाबींकरिता खेळाडू व त्यांच्या कुटूंबियांना रुपये २ ते १० लक्ष रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूंना इतर माध्यमाद्वारे मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत देखील माहिती पुरविणे आवश्यक आहे, त्याशिवाय खेळाडूंनी केलेल्या ऑनलाईन अर्जाची माहिती खालील संकेतस्थळावर भेट देणाऱ्या सर्वांसाठी उपलब्ध असेल.
आर्थिक सहाय्यासाठी आवश्यक असणारे खेळाडू पात्रतेचे निकष व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारच्या https://dbtyas-sports.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
Share your comments