मुंबई - कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटावर मात कशी करायची आणि देशाची आर्थिक घडी कशी बसवायची यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. याआधी रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. आता त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी राहुल यांनी संवाद साधला. या दोघांनी कोरोना संकटातून बाहेर पडताना अर्थव्यवस्थेतील आव्हानांबाबत चर्चा केली. अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी यावेळी लोकांच्या हातात रोख रक्कम पोहोण्याची गरज आहे, अशा वेळी एखाद्याने कर्ज माफ करावे आणि रोख मदत करावी, असा सल्ला दिला.
राहुल गांधी यांनी संवाद साधताना म्हटले, आज रोख रक्कम अडचणीची ठरणार आहे, बँकांसमोर अनेक आव्हाने असतील आणि नोकरी वाचवणे कठीण होईल. यावर अभिजीत यांनी सांगितले, हे अगदी खरे होण्याची शक्यता आहे. तसे होत आहे. अशा परिस्थितीत देशात आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी हे केले आहे, परंतु तसे आपण केलेले नाही. छोट्या उद्योगांना मदत करावी, या तिमाहीत कर्ज देयके माफ करण्याची गरज आहे. यासह त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. लॉकडाऊनमधून जितक्या लवकर बाहेर पडू ते अधिक चांगले असेल. त्यानंतर नवीन योजना आखण्याची गरज आहे. तसा प्लान हवा. अन्यथा सगळा पैसा वाया जाईल. कोरोना महामारीबाबत माहिती होण्याची गरज आहे. साथीच्या रोगाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, लॉकडाऊन वाढवून काहीही होणार नाही. सरकारला याआधीच सल्ला दिला आहे. लोकांना रेशन उपलब्ध करुन दिले पाहिजे.
किमान तीन महिने यावर काम केले पाहिजे. तसेच प्रत्येकाला मोफत रेशन देण्याची गरज आहे. प्रत्येकाला तांदूळ, गहू, साखर यांची जरुरी आहे. प्रत्येकापर्यंत पैसे पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी एक चांगले वातावरण असले पाहिजे. ज्याच्याजवळ बँक खाते नाही. त्यांच्याकडे काहीही नाही, त्यांचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल. राज्य सरकार अधिक मदत देतात, जेव्हा असे केले जाते तेव्हा सामान्य लोकांपर्यंतचे पैसे येतात.
Share your comments