भारत देश मोठ्या गर्वाने कृषीप्रधान असल्याचा दावा करतो, मात्र याच कृषिप्रधान देशात सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लुटमार केली जातं आहे. शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते मात्र त्याच्याच पालन-पोषण वर काही पैशांच्या हव्यासापोटी गदा आणला जात असल्याचे चित्र या वेळी देशात बघायला मिळत आहे. त्यामुळे ज्या मायबाप सरकारला शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी, त्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व परिणामी बळीचे राज्य घडवण्यासाठी भारताच्या सत्तेवर मोठ्या मानाने विराजमान केले गेले त्यांच्याच आश्रयाखाली काही लोकांद्वारे बळीराजाचे शोषण केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्याद्वारे केला जातं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे निकृष्ट बियाणे आढळले होते. संबंधित कंपनीवर वर्धा जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप प्रल्हादराव सूटे यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात अधिक माहिती अशी की, या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एका सोयाबीन बियाणे कंपनीची बियाणे पेरणी केल्यानंतर त्यांचे अंकुरणच झाले नाही. म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागात अनेक वाऱ्या केल्या, मात्र शेतकऱ्यांनी अनेक वेळा पायमल्ली केल्यानंतर देखील त्यांच्या तक्रारी कचऱ्याच्या केरीतच जमा होत्या. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी या सोयाबीन कंपनीची बियाणे वापरात आणली त्यांची मते घेऊन वर्धा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष संदीप यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.
बोगस बियाण्यांची ही पहिलीच वेळ आहे असे मुळीच नाही, यापूर्वी देखील हंगाम सुरू झाला की बोगस बियाण्यांची विक्री सर्रासपणे होत आली आहे. शेतकऱ्यांची बोगस विक्री करून मोठी आर्थिक कोंडी केली जात असली तरी मात्र मायबाप सरकार आणि प्रशासन या बाबींकडे जातीने लक्ष घालायला तयार नाही. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर बळीराजा याबाबत तक्रार दाखल करतो त्यानंतर कृषी विभागाचा फलाना-वलाना अधिकारी नुकसानीची पाहणी करतो. मात्र तदनंतर या नुकसानीची दखल कुणाकडनच घेतली जात नाही. केवळ नुकसानीची पाहणी केली जाते आणि जेव्हा या नुकसानीसाठी भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा मात्र प्रशासन कुठेतरी भलत्याच ठिकाणी गायब होऊन जाते. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा क्षतीग्रस्त झाला आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट व कधी ढगाळ हवामान यामुळे पिकांवर नेहमीच रोगाचे सावट कायम असते. या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट घडून येते परिणामी शेतकरी राजाना पदरी तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला असता, दुष्काळात तेरावा महिना म्हणुन केवळ काही पैशांच्या हव्यासापोटी बोगस बियाणे विक्री केली जाते आणि यामुळे शेतकरी राजांचा संपूर्ण हंगाम उध्वस्त होतो परिणामी शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर येतो.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बोगस बियाणे पेरले गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यासंदर्भात राजकीय वर्तुळात आवाज उठवला गेला होता, मात्र याचा निकाल अद्याप पर्यंत लागलेला नाही. आता नागपूर खंडपीठाकडे वर्धा जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या नेत्याने याचिका दाखल केली असल्याने संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा आहे. दरम्यान खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते, मात्र या नुकसानीचे अद्याप पर्यंत पंचनामे झाले नसल्याने शासन-प्रशासन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करेल याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आता संबंधित प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन आहे त्यामुळे शासनाने याकडे जरी पाठ फिरवली असली तरी न्यायालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
Share your comments