पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील म्हसोबाचीवाडी येथे १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडला आहे. यामुळे याठिकाणी एकच गर्दी झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी शोध घेतला जात आहे. उवरित तिघांची शोध मोहिम सुरु आहे. येथे विहिरीला रिंग तयार करण्याचे काम सुरु असताना मंगळवारी दुपारनंतर अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीतील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली.
संध्याकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. तीन दिवसापासून बचाव कार्य सुरु होते. विहिरीची खोली जास्त असल्यामुळे बचाव कार्याला अडचण येत होती. याठिकाणी अनेक मशीन बोलवण्यात आल्या आहेत. अजूनही याठिकाणी काम सुरूच आहे.
माती व मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०), व लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) चौघेजण अडकले होते. यामुळे त्यांचा शोध सुरू होता.
आज सकाळी चौघांचा शोध सुरु केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका मजुराचा मृतदेह सुमारे ६५ तासानंतर एनडीआरएफ जवानांना मिळाला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला.
Share your comments