शेतकरी सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. अवकाळी पाऊस तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या बाजारभाव नसल्याने तो संकटात सापडला आहे. यामुळे आता केंद्र सरकारने खतांचे दर तत्काळ नियंत्रणात आणावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करत तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. यामुळे आता मोदी काय निर्णय घेणार याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी याबाबत मागणी करत होते.
तसेच ते म्हणाले, केंद्र सरकारच्या शेतमालाच्या हमीभावाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि खतांच्या दरवाढीमुळे शेती आर्थिकदृष्ट्या नुकसानीत जात आहे. यामुळे आता ते केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्रातील सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. इंधन दरवाढ, खतांच्या वासधात्या किंमती आणि भातपिकाची हमीभावाने खरेदीस दिलेला नकार यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजन फॉस्फरसच्या किमती गेल्या तीन महिन्यांत ५० टक्क्यांनी आणि पोटॅशियमच्या किमती १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेल्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात गेल्या ५ वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करून ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राव यांनी आता भातपिकाच्या मुद्यावरून केंद्राशी मतभेद असणाऱ्या अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. याबाबत त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्यास सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे. राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारिया विजयन यांचीही भेट घेऊन चर्चा केली आहे. यामुळे आता मोदी हे दर कमी करणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. यासाठी शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. आता यासाठी देखील केंद्र सरकारशी संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Share your comments