1. बातम्या

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी थेट बांधावर खते

KJ Maharashtra
KJ Maharashtra


सातारा:
कोरोनाच्या संकटात नागरिकांना बाहेर पडण्यावर मर्यादा आहेत. ही गोष्ट लक्षात घेवून खरीप हंगामासाठी लागणारे बि-बियाणे व खते यांच्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बि-बियाणे खते दिले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बि-बियाणांचे व खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळातही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यावर शासनाने भर दिला होता, असे सांगून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, या काळात महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज हजारो क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक झालेला भाजीपाला विविध माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत पोहोचत होता, ही व्यवस्था चालू राहीली ती केवळ शेतकऱ्यांमुळेच.

आज कोरोना सोबतच राज्यात आलेल्या टोळधाड, हुमणी यांसारख्या आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे. त्यांनी सूचविलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी राबविल्या पाहिजेत, असे आवाहनही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांनी घेतली बीज प्रक्रिया उद्योगाची माहिती

लागणीनंतर आठ ते दहा दिवसांमध्ये सोयाबिन पिकावर खोड माशी, खोड किडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे रायजोबियमच्या सहाय्याने बियाण्यावर प्रक्रिया करुन ते लागण करण्याच्या योग्य तयार करण्याच्या  कृषी विभागाकडून चालू  प्रक्रियेची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती घेतली. तसेच या प्रकारे प्रक्रिया केलेले ३०० क्विंटल बियाणे वाटप केल्याचे ही कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवित आहेत त्या योजना आणखी प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती श्री. जगदाळे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, उंब्रजचे मंडळ कृषी अधिकारी रवी सुर्यवंशी, सदस्या शालन माळी, सदस्य रमेश चव्हाण, निगडीचे सरपंच आत्माराम घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters