डॉ.आदिनाथ ताकटे
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा १ जुलै ला जन्मदिन, हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा,त्यांचा त्यात सदैव ध्यास असे. मराठीला राजभाषेचा दर्जा देणे,शेतमालाला हमीभाव,पंचायत राज्य,रोजगार हमी योजना हे उपक्रम त्यांच्या कारकीर्दीत साकार झाले.
सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ज्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले,त्या स्व.वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली या खेड्यात फुलसिंग नाईक या बंजारा समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.आपल्या मुलाने खूप शिकून गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करावे हे त्यांचे स्वप्न होते. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर ते यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळात महसूलमंत्री झाले अशा प्रकारे घोडदौड करीत ते पुढे डिसेंबर १९६३ ते फेब्रुवारी १९७५ पर्यंत सलग ११ वर्षे महाराष्ट्र्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले.
राज्यातील सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी व समृद्ध व्हावा यासाठी कृषी उत्पादन वाढीला योग्य दिशा व चालना देण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीचा संदेश सर्वदूर नेला.प्रत्येक घराच्या परिसरात किमान एक झाड,तर शेताच्या बांध-बंधाऱ्यावर वृक्षवल्ली लावून महाराष्ट्रातील कणाकणात समृद्धी फुलवा.शेती समृद्ध करण्यासाठी नद्यानाल्यांचे पाणी अडवा व जमिन भिजवा,असा मोलाचा संदेश देऊन त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व किती असते याची जाणीव करून दिली.याचा आधार घेऊन राज्य शासनाने पाणी अडवा-पाणी जिरवा,तुषार योजना,ठिबक सिंचन योजना कार्यरत केली.कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी नदीनाल्यांवर लहान बंधारे बांधण्याची योजना त्यांनी आखली व ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरली आणि हेच बंधारे पुढे वसंत बंधारे म्हणून राज्यात लोकप्रिय झाले.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आधुनिक शेतीचा पाया घातला,असे म्हटले तर वावगे होणार नाही.त्यांनी मृदसंधारण,जलसंधारण, सिंचन व संकरीत बियाणे हे कार्यक्रम सुरु करून महाराष्ट्रातील अन्नधान्याच्या पिकांची उत्पादकता वाढवली.
महाराष्ट्रात होणारी जमिनीची धूप सर्वात मोठी समस्या आहे. जमिनीची सुपिकता हि तीच्या वरच्या थरांतच असते हा थर तयार होण्यास शेकडो वर्षे लागतात,परुंतु पावसामुळे हा थर काही दिवसांतच धुवून जातो आणि जमिनीची सुपिकता नष्ट होते. (कै.) वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेद्वारे महाराष्ट्रातील हजारो एकर जमिनीवर मृद्संधारणाचा कार्यक्रम हाती घेतला व या जमिनीवर समपातळीत बांध घालून जमिनीची धूप थांबवली. त्यामुळे राज्यातील पिकांची उत्पादकता वाढत आहे.
महाराष्ट्रातील ८४ टक्के जमीन कोरडवाहू आहे. अनियमित व अपुऱ्या पावसामुळे या क्षेत्रातील अन्न्ध्यानांच्या पिकांची उत्पादकता फार कमी आहे. हे जाणून वसंतराव नाईकांनी पाझर तलावांची योजना सुरु केली. त्यामुळे पिकांत सरंक्षक सिंचन प्राप्त होऊन पिके वाचू शकली. पाझर तलावातील पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याची वाढ झाली व परिसरातील विहिरींना पाणीपुरवठा झाला,ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी होते त्यांची खरीप पिके तर शाश्वत झाली परंतु त्यांना रब्बी हंगामात गहू व ज्वारी यासारखी अन्न्धानन्यांची पिके घेणे शक्य झाले.
१९७२ च्या दुष्काळाने साऱ्या राज्यात कहर केला होता यापुढे शेतकरी ,कामगार,कष्टकऱ्यांना भीषण अश्या संक्रमण काळातून जावे लागले. दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजनेचे संकल्पना पुढे आणली आणि हे योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून गणले गेले आहे. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा नेहमी विचार केला, शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल असे खणखणीत विचार नाशिक येथे भरलेल्या शिबिरात व्यक्त केले होते.
वसंतराव नाईक हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. वसंतराव नाईक हे मोठे द्रष्टे होते.राज्यात हरितक्रांती यशस्वी करावयाची असेल तर जिरायती जमिनीत पूरक असलेल्या ज्वारीच्या संकरीत जातीची लागवड करावी लागेल हे त्यांनी ओळखले.या पिकाला शाश्वत ओलावा मिळावा म्हणूनत्यांनी सर्वत्र मृद व जलसंधारणाचा कार्यक्रम सुरु केला.
राज्यातील शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर प्रतेक शेतकरयाने विज्ञान व तंत्रज्ञान याचा उपयोग केला पाहिजे.या हेतूने वसंतराव नाईक यांनी राज्यात चार कृषि विद्यापीठे सुरु केली. शेतीची समृद्धी व्हावी व त्याद्वारे शेतकरी सुखी व्हावा हाच ध्यास त्यांनी ठेवला.दूरदृष्टी असलेले वसंतराव नाईक हे १८ ऑगस्ट १९७९ रोजी अनंतात विलीन झाले शेतीतून समृद्धी मिळवण्यासाठी त्यांच्या विचारांचे पोषण होणे गरजेचे आहे. नाईक यांच्यासारखे कृषिप्रेमी आपल्याला हरितक्रांतीच्या वेळेस लाभले हे आपले भाग्यच.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो.9404032389
Share your comments