1. बातम्या

कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती

KJ Staff
KJ Staff


नागपूर:
शेती आणि कृषीला प्राधान्य देत मागील वर्षात विदर्भासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती दिली आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासास‍ह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दै. तरूण भारतच्या वतीने आयोजित विदर्भ आणि परिसराचा सर्वांगीण विकास’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे प्रबंध संचालक धनंजय बापटनरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डॉ. विलास डांगरेमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकरसंपादक गजानन निमदेव उपस्थित होते. यावेळी तरुण भारतच्या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शेती आणि सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करीत असतानाच राज्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक प्रकल्प अवघ्या 4 वर्षात प्रगतीच्या मार्गावर आहेत, याची माहिती दिली. अमरावती येथे सुरू करण्यात आलेला टेक्सटाईल पार, विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात देण्यात असलेली सवलत, नागरिक-सरकार संबंध आणखी भक्कम करण्यासाठी डिजिटल उपाय आणि पर्यटन विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाज, राज्य आणि देशात घडत असलेल्या बदलांवर अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून मंथन होते. या मंथनातून नक्कीच चांगल्या कल्पना मांडल्या जातात. गेल्या चार-साडेचार वर्षांत विदर्भ आणि राज्य पातळीवर विकासकामे झपाट्याने होत आहेत. विरोधी पक्षात असताना विदर्भातील विविध समस्या मांडायचो, त्या समस्यांची यादीच बनवली होती. त्याच्या ब्ल्यू प्रिंटचे काम मोठ्या ताकदीने केले. त्यामुळे आता त्याचे परिणाम विकासाच्या माध्यमातून दिसून येत आहेत.

शेती, उद्योगासह सर्वच क्षेत्रात मूल्यवर्धन करायचे असेल तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून शाश्वत शेती आणि सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ प्रकल्प सुरु करून चालत नाहीत तर ते पूर्णत्वास नेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगताना राज्य शासनाच्या गेल्या चार-साडेचार वर्षांत विदर्भासह राज्यातील जुन्या प्रकल्पांना फेरप्रशासकीय मान्यता दिली. ते आता पूर्णत्वास जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या चर्चासत्रात सांगितले. श्री. गडकरी यांनी केंद्र शासनाकडून भरघोस निधी मिळवून दिला. त्यामुळे विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यातील अर्धवट पडून असलेल्या प्रकल्पांचे काम सुरु केले. गेल्या वर्षभरात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामधून आता एक लाख हेक्टरवर सिंचन होत असून, भविष्यात त्या सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात शाश्वत शेतीच्या सिंचनासाठी राज्य शासनाने धडक सिंचन विहीर, मागेल त्याला शेततळे आदि योजना सुरु केल्या. त्याशिवाय पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना बोड्यासाठीही निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगून ते म्हणाले की खुल्या कॅनॉलऐवजी आता बंद पंपांमधून शेतीला पाणी नेण्याचे काम सुरु केला असून आहे. शेतीला कमी पाण्यातून जास्त उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. त्यासाठी शासन त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल पिकवतो. मात्र त्याच्या मालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतमालावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विदर्भातील अमरावती येथे गेल्या वीस वर्षात प्रथमच इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरु केला असून कापड आणि फॅशनेबल कपडे असा पक्का माल तयार करुन मार्केटमध्ये आणला जात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच मोर्शी येथे कोका कोला, पेप्सी, पतंजलीचे काम सुरु करत आहोत. त्यांच्या शीतपेयांमध्ये या भागात पिकणारा संत्रा, त्यातील पल्प वापरता येणार असल्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. पूर्वीच्या तुलनेत आता या भागात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढत असून उद्योगांसाठी छत्तीसगड आणि मध्यप्रदेश पेक्षाही कमी दरात विजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच खनिकर्म विभागाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्वच भागात विकासकामे आणि उद्योग उभारणीवर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters