अकोला, दि. 24 ज्या शेतकऱ्यांना अदयाप पिक विमाचे पैसे मिळाले नाही, त्यांना ते लवकरच मिळतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या मंडळामध्ये पिक विमा लागू झालेला आहे आणि पिक विम्याची पावती असणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत पिक विम्याचे पैसे मिळतील, असा दिलासा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांना दिला.
प्रधानमंत्री पिक विमा योजना, फळपिक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, नॅशनल इंशोरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शाम चिवरकर आदींसह अन्य विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पिक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, पिक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले, पिक विमा रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली, बोंडअळी नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई मिळावी आदी स्वरुपाच्या तक्रारी मांडल्या. अकोट तालुक्यातील शेतकरी शालीकराम बुले यांचे पिक विम्याचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्या आहेत, याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी म्हणाले की, येत्या पंधरा दिवसांत जिल्हा मध्यवर्ती बँकेने श्री. बुले यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, पैसे जमा न झाल्यास बँकेवर कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांना विमाचा लाभ भेटला नाही, त्यांची यादी येत्या तीन आठवडयात प्रसिध्द होणार आहे. या यादीत विमाधारक ज्या शेतकऱ्यांचे नाव नसेल तर यावर विमा कंपनीने तातडीने कार्यवाई करुन संबंधित शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच मार्च-2017 पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले आहेत, याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय बँक समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पिक विम्याबाबत तक्रारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत समाधान केले. पिक विमा भरपाईच्या दोन यादया अदयापपर्यंत प्रसिध्द झाल्या आहेत. त्यापैकी पहिली यादी 6 जून रोजी प्रसिध्द झाली. सुमारे 63 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरी यादी 16 जुलै रोजी प्रसिध्द झाली. याव्दारे सुमारे 39 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तिसरी यादी तीन आठवडयात प्रसिध्द होणार आहे. त्याव्दारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळतील, अशी माहिती श्री. चिवरकर यांनी यावेळी दिली.
Share your comments