1. बातम्या

समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

मुंबई: समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती. पण राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अनुसरुन कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती. पण राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अनुसरुन कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या या उपसमितीने मदतीच्या निर्णयास तातडीने मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 700 किमी लांबीच्या कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

या नवीन निर्णयानुसार आता समुद्राच्या उधाणामुळे कोरडवाहू क्षेत्राचे नुकसान झाल्यास प्रति हेक्टर 6 हजार 800 रुपये, आश्वासित सिंचन असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाल्यास 13 हजार 500 रुपये तर बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यास 18 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत मिळणार आहे. शेतपिकाचे 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाल्यास ही मदत मिळणार आहे. 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळेल. याशिवाय समुद्राच्या उधाणामुळे खारे पाणी शेतजमिनीमध्ये घुसून शेतजमिनीचे  कायमस्वरुपी नुकसान झाल्यास प्रति हेक्टर 37 हजार 500 रुपये इतकी मदत मिळणार आहे. ही नुकसानभरपाई 2 हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

याशिवाय समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाचे तसेच शेतजमिनीचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचाही शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार समुद्राचे पाणी शेतात घुसू नये यासाठी खारभूमी प्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना खारभूमी विकासमंत्री श्री. दिवाकर रावते म्हणाले,विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शासनाकडून लोकांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमवर्षाव, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे आदी आपत्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये आपदग्रस्त लोकांना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आपत्तींच्या या यादीमध्ये आतापर्यंत समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाच्या होणाऱ्या नुकसानीचा समावेश नव्हता.

वास्तविक पाहता समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे कोकणातील समुद्र तटावरील शेतपिकांचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीवर कांदळवनाची वाढ होते. त्यामुळे या आपत्तीच्या प्रकाराचा नुकसान भरपाईस पात्र आपत्तीमध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचे होते. त्यास अनुसरुन आपण 22 जानेवारी 2019 रोजी मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांकडे समुद्राच्या उधाणामुळे पिकाच्या आणि जमिनीच्या होणाऱ्या नुकसानीस भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. महिनाभर या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या क्रांतिकारी निर्णयाबद्दल मंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनीही या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांचेही मंत्री श्री. रावते यांनी आभार मानले आहेत.

English Summary: Farmers will get compensation in case of damage due to the cyclone of sea (1) Published on: 07 March 2019, 09:43 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters