मुंबई: जैविक शेती मिशनच्या माध्यमातून एकात्मिक शेती व्यवस्थापनाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केली. मंत्रालयात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची पहिली बैठक कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे उपस्थित होते.
अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांचा या मिशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. विषमुक्त सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देतानाच शेतकऱ्यांचा गट स्थापन करुन शेतीमालाला बाजारपेठेसोबत योग्य भाव मिळवून देण्यासाठी मिशन काम करणार आहे. त्याचा कालावधी चार वर्षांचा असून त्याद्वारे सेंद्रिय शेतीसाठी चालना दिली जाणार आहे. सध्या तीन जिल्ह्यांमध्ये समूह विकास पद्धतीप्रमाणे 55 गावांचा मेगा क्लस्टर तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे 500 गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या मिशनच्या माध्यमातून अधिक सक्षम केले पाहिजे. या मिशनद्वारे जैविक शेती करणारा शेतकरी अधिक समृद्ध होऊ शकतो. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकात्मिक शेती व्यवस्थापन पद्धत वापरुन शेतीला कुंपण, पाणी, सूक्ष्म सिंचनाची सुविधा, शेतकऱ्याचा शेतात रहिवास, जनावरांसाठी गोठा, वीज, शेतापर्यंत रस्ता आदी सुविधा पुरविल्यास शेतमालाचे उत्पादन ते साठवणूक आणि मूल्यवर्धन याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.
बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, डॉ. किरण पाटील, मिशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Share your comments