योग्य बाजारभावासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती प्रमाणीकरणावर भर द्यावा

Thursday, 05 December 2019 08:44 AM


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागातील प्रत्‍येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक 2 ते 4 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 3 डिसेंबर रोजी झाले, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माजी सहयोगी अधिष्ठाता तथा जेष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे, पुणे येथील जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. गोविंद हांडे, मुंबई येथील श्री. रोणक ठक्कर, केंद्राचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेती करतांना शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे अन्नधान्य उत्पादन आणि शाश्‍वत उत्पादन यांचा मेळ घालण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीवर भर देण्याची गरज आहे. भाजीपाला पिकांत अनियंत्रित रासायनिक किटकनाशकांच्या वापरामुळे एकिकडे खर्च वाढतो तर दुसरीकडे रासायनिक अवशेष त्यात दिसून येतात.

रसायनांच्या अमार्यादीत वापरामुळे जमिनीच्या आरोग्याबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. योग्य मशागत, सेंद्रीय खतांचा वापर, आंतरपीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश, जैविक खते व बुरशीनाशकांचा वापर करुन परिपुर्ण सेंद्रीय लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल. विद्यापीठाने लागवड तंत्रज्ञानाबरोबरच जैविक किड व रोग व्यवस्थापन तसेच सेंद्रीय प्रमाणीकरण व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावरही विविध क्षेत्रामधील तज्ञांना प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले आहे, याचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. पशुधन हा सेंद्रीय शेतीतील महत्वाचा घटक असुन पशुधन व्यवस्थापन व महत्वाचे चारापीक व्यवस्थापनावर लक्ष देण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. गोविंद हांडे यांनी रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत असुन मोठ्या शहरासोबतच स्थानिक पातळीवरही यास मागणी वाढत आहे. चांगला बाजारभाव मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना स्पर्धेच्या बाजारपेठेत आपल्या मालाची विशिष्ठ ओळख निर्माण करता आली पाहीजे, असे ते म्‍हणाले तर जेष्ठ मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी सेंद्रीय शेती करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे आवश्‍यक असुन माती परिक्षण करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगुन सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.   

कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील सहभागी शेतकरी प्रशिक्षार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन कृषी किटकशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव यांनी केले तर आभार श्री. अे. के. कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आर. एस. जाधव, डॉ. आनंद दौडे, डॉ. सौ. पी. एच. गौरखेडे, श्री. प्रल्हाद गायकवाड, श्री. बी. बी. धारबळे, डॉ. सुनिल जावळे, श्री. एस. बी. पतंगे, श्री. एस. बी. कटारे, श्री. सचिन रनेर, श्री. डी. बी. गरुड, श्री. बी. एस. वाघ आदींनी परिश्रम घेतले.

तांत्रिक सत्रात सिक्कीम येथील सेंद्रीय शेतीचे अनुभव यावर श्री. बी. एस. कच्छवे यांनी मार्गदर्शन केले तर सेंद्रीय शेतीत पिक अवशेषांचा वापरावर डॉ. अजितकुमार देशपांडे व डॉ. गोविंद हांडे, सेंद्रीय बाजारपेठ व्यवस्थापनावर श्री. रोनक ठक्कर यांनी तर सेंद्रीय पिक उत्पादन यावर कृषी यांत्रिकीकरण तज्ञ डॉ. एस. एन. सोळंकी व डॉ. आनंद गोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Organic Farming organic organic certification सेंद्रीय शेती प्रमाणीकरण सेंद्रीय शेती Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.