परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि रिलायन्स फाऊंडेशन द्वारा आयोजित दिनांक 6 मे रोजी ऑडिओ कॉन्फरन्सव्दारे शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात 42 गावामधील 50 शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी. देवसरकर आपल्या मार्गदर्शनात येणार्या खरीप हंगाम मध्ये उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधवांनी आंतरपीक पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, आंतर पीक लागवड करतांना एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एका क्षेत्रावर घेऊ नयेत, एकाच प्रकाराचे पिकांची मुळांच्या प्रकार असणा-या पिकांची निवड आंतरपीक पद्धतीत करू नये.
आंतरपीक पद्धतीत लवकर पक्व होणारी व उशिरा पक्व होणारी पिके एकत्रितपणे निवडावी. यामध्ये त्यांनी आंतर पीक पद्धतीचे विविध प्रकार, मिश्र पीक पद्धती, जोड ओळ पद्धत, पट्टा पद्धत आदींची फायदे सांगुन एक पीक पद्धतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते, दोनपैकी किमान एका पिकाच्या उत्पन्नाची शाश्वती अधिक असते, तसेच जमिनीचा मगदूर ही टिकून राहण्यास मदत होते असे सांगितले. संवादात बीज प्रक्रिया व बियाणे निवड, ऊस खत व्यवस्थापन या संदर्भात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक तथा कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांनी माहिती दिली तर गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. जे. शिंदे यांनी आंबा, पेरु, सिताफळ आदी फळबाग लागवड व हळद लागवड यावर मार्गदर्शन केले.
प्रा. डी. डी. पटाईत यांनी कीड-रोग व्यवस्थापनावर माहिती दिली. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी कोविड-१९ परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांना योग्य सामाजिक अंतर जोपासणे अत्यंत गरजेच असल्याचे सांगितले. कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत आदीवर प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.
Share your comments