राज्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी गव्हाच्या लागवडीत मोठी घट झाली असल्याने गव्हाच्या उत्पादनात देखील मोठी घट झाली असणार असा अंदाज आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू बाजारपेठेत विक्रीसाठी येऊ लागला आहे.
बाजारपेठेतील चित्र बघता यंदा प्रथमच गव्हाची आवक कमी असल्याचे समजत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, या रब्बी हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाचे क्षेत्र कमी झाले आहे. रब्बी हंगामात गव्हाची पेरणी कमी झाली असल्याने अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली गव्हाचे बियाणे कंपन्यांकडे वापस पाठवली आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी फक्त घरासाठीच गव्हाची पेरणी केल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील बाजारपेठेत गव्हाचा दुष्काळ बघायला मिळत आहे.
असे असले तरी, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना गव्हाचा चांगला उतारा मिळत आहे. सध्या नवीन गव्हाला बाजारपेठेत 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण दर मिळत आहे. अशातच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आगामी काही दिवसात गव्हाच्या दरात भाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले असून गहू विक्री करायची गव्हाची साठवणूक करायची याबाबत निर्णय घेण्यास अक्षम बनला आहे.
पुणे जिल्ह्यात गव्हाची पेरणी कमी झाल्यामुळे गव्हाची आवक देखील कमी बघायला मिळत आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या गव्हाच्या दरात आगामी काही दिवसात वाढ होऊ शकते असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी कापसाला आणि सोयाबीनला उत्पादनात घट झाली असल्यामुळे चांगला उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे गव्हाच्या दरवाढीबाबत देखील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
असं असलं तरी, जर गव्हाचे बाजार भाव वाढले नाहीत तर गहू घरात ठेवून काय करायचे असा सवाल शेतकरी बांधवांच्या मनात उपस्थित होत आहे. गव्हाची साठवणूक केली आणि दरात स्थिरता राहिली तर शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकरी संभ्रम अवस्थेत सापडला आहे तरीदेखील शेतकरी बांधव तूर्तास गव्हाची साठवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यावर्षी गव्हाचा पेरा कमी झाल्याने उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:-
अच्छे दिन आ गए रे….! कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव
काय सांगता! कापसाच्या या जाती देतात बम्पर उत्पादन; बोंड आळीचा देखील होतं नाही विपरीत परिणाम, वाचा
Share your comments