राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात कापूस लागवड केला जातो. कापसानंतर सर्वात जास्त लागवड सोयाबीन पिकाची बघायला मिळते. विदर्भात देखीलकापूस हे मुख्य पीक आहे. मात्र आता कालांतराने विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस पिकाला फाटा देत मोठ्या प्रमाणात खरीप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र खरीप हंगामात समाधानकारक सोयाबीनची लागवड होत असली तरी विदर्भात उन्हाळी हंगामात अद्यापही सोयाबीन लागवडीकडे शेतकरी बांधव वळलेला दिसत नाही. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष वेधून उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी होत आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापुर तालुक्यामध्ये जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामात लागवडीखालील असते. या एवढ्या मोठ्या क्षेत्रात तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीनचा पेरा केला जातो या खरीप हंगामात देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीस विशेष पसंती दर्शवली होती. तालुक्यात सोयाबीन नंतर सर्वात जास्त कापसाची लागवड केली जाते. या खरीप हंगामात मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील या मुख्य पिकांना मोठा फटका बसला आणि उत्पादनात कमालीची घट नमूद करण्यात आली. मात्र, खरीप हंगामातमोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीस प्राधान्य दिलेले दिसत नाही.
तालुक्यातील थोड्याशा क्षेत्रात उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे पाठ फिरवली आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीन पेरणीच्या प्रयोगाबद्दल शेतकऱ्यांना अद्यापही विशेष असे ज्ञान नसल्याचे कळत आहे. तसेच उन्हाळी हंगामात पदरी उत्पादन पडते की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. विदर्भात तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत मजल मारत असते. सोयाबीन पिकाला एवढे तापमान असह्य असते. एवढ्या प्रचंड तापमानात सोयाबीन तग धरू शकत नसल्याने बहुतांश शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवड प्राधान्य देत नाहीत.
तसेच सोयाबीन पिकासाठी पाण्याचा मुबलक साठा असणे अनिवार्य आहे, मात्र विदर्भात विशेषता उन्हाळी हंगामात पाण्याची वणवण असल्याने शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीचा विचार करत नाही. विदर्भातील या नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत बहुतांशी शेतकरी बांधव उन्हाळी सोयाबीन लागवडसाठी धाडस करत नाही.
Share your comments