देशात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्यांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. या भीषण उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण सर्वजन कूलर, एसी यांसारख्या साधनांचा अवलंब करू शकतो, परंतु जनावरांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काहीच पर्याय नाही. मात्र, वाशिम जिल्ह्याच्या एका अवलिया पशुपालक शेतकऱ्याने आपल्या म्हशींना तापमानाच्या कहरापासून वाचवण्यासाठी एक अप्रतिम आणि हटके देशी जुगाड केला आहे. या जुगाडाची चर्चा आता संपूर्ण देशात रंगत आहे.
महाराष्ट्रातील वाशिममधील उमरा गावाचे रहिवाशी पशुपालक शेतकरी प्रवीण काळे गेल्या अनेक वर्षांपासून पशुपालन करत आहेत. प्रवीण यांच्याकडे एकूण 13 दुभत्या म्हशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला असून, या तापमानाचा परिणाम प्रवीण काळे यांच्या दुभत्या म्हशींवर झाला असून, म्हशींनी दूध देणे बंद केले आहे. वाढत्या तापमानामुळे पशुपालक शेतकऱ्याच्या दूध व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. अशीच काहीशी अडचण प्रवीण यांना देखील जाणवली आणि हेच टाळण्यासाठी या शेतकऱ्याने एक भन्नाट कल्पना शोधून काढली.
प्रवीण यांनी तबेल्यात म्हशीसाठी शॉवर बसवण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी ह्या देशी जुगाडसाठी एक मोटार घेतली, तबेल्याच्या छतावर 6 फॉगर्स बसवले आणि पाईपच्या साहाय्याने जोडले, फॉगरला जोडलेला पाईप पाण्याच्या टाकीत टाकला. एवढेच नाही या अवलिया शेतकऱ्याने लोडशेडिंगच्या समस्याचे देखील समाधान शोधून काढले आहे. या शेतकऱ्याने वीज नसेल तरीही शॉवर सुरु ठेवता येईल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. यासाठी या शेतकऱ्याने सौरऊर्जेच्या प्लेटचा उपयोग घेऊन त्याला कारंजे जोडले आहेत.
आता या शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळू लागले असून, त्याच्या या देशी जुगाडमुळे म्हशींना तापमानापासून दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवीणच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी बघायला मिळाला आहे. विशेष म्हणजे प्रवीण काळे यांचा हा अनोखा प्रयोग केवळ 4 ते 5 हजार रुपयात तयार झाला आहे. यामुळे या जुगाडाची सर्वत्र चर्चा होतं आहे.
Share your comments