Agriculture News : राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच राज्यातील बळीराजा संकटात असताना कृषीमंत्री मात्र परदेशात फिरताय असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज (दि.१) बैठक पार पडली. ५ जून पासून विदर्भात काँग्रेस पाहणी दौरा करून त्यासंदर्भात अहवाल राज्य सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांसाठी आम्ही मदतीची मागणी करणार आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत, ते बाहेर असताना आयुक्तांची बदली होते. पूर्णवेळ सचिव नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना बैठक होत नाही.
खतांचा तुडवडा आहे, बियाणाचे दर वाढले, बियाण्यांसाठी लोक रांगेत उभे आहेत. या सर्व परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा मारत आहेत. शेतकरी जगला काय आणि मेला काय या सरकारला काय फरक पडतो ? राज्यातील शेतकऱ्यांप्रती महायुती सरकारची अनास्था यामधून दिसत आहे, असं देखील वडेट्टीवार म्हणालेत.
राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई
राज्यभरात दुष्काळाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक चिंतेत आहेत. राज्यातील जवळपास ११ हजारांपेक्षा जास्त वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाईची झळ बसत आहे. तर राज्यातील २५ जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. तर ३ हजार ७०० हून अधिक टँकरनं या दुष्काळी भागात नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी १ हजार ३०० गावांना फक्त ३०५ टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता.
Share your comments