राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अनेकांच्या उसाला तुरे आले तरी ऊस रानातच आहे, यामुळे शेतकरी संतापले आहेत. 15 ऑक्टोंबरला यंदाचा गाळप हंगाम सुरु झाला होता. आता गाळप अंतिम टप्यात आहे. तरी मात्र, शेतकऱ्यांचा ऊस आजून फडातच आहे. शेतकऱ्यासमोर आधीच अनेक संकट आहेत. यामध्ये आता आणखी भर पडली आहे. ऊस तोड झाली नाही त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढली असताना, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस मात्र फडातच आहे.
लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे असते. ऊसाचे वजन आणि दर याचा समतोल राखला जातो. पण आता 14 महिने उलटूनही ऊस शेतातच असल्याने उत्पादनात घट होणार आहे. मांजरा नदीकाठचा भाग तर ग्रीन बेल्ट म्हणूनच ओळखला जात आहे. गेल्या चार वर्षापासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. अनेकांच्या उसाला हुमणी देखील लागली आहे. यामुळे आता वजन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.
सध्या लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामात 11 साखर कारखान्यांचे गाळप हे सुरु आहे. यामध्ये मांजरा विकास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, पणगेश्वर साखर कारखाना, सिद्धी सहकारी साखर कारखाना, ट्वेंटीवन 01, ट्वेंटीवन 02, जागृती सहकारी साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना, मारोती महाराज सहकारी साखर कारखाना, औसा तालुक्यातील गोंदरी साखर कारखाना, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर यांचा समावेश आहे. असे असताना हजारो हेक्टरवरील ऊस अजूनही फडातच आहे. यामुळे ऊस घालवण्यासाठी अनेकांची पळापळ सुरु आहे.
जे सभासद आहेत त्यांचा ऊस फडातच आहे. साखर कारखाने अर्थर्जानाचा विचार करुन जे सभासदही नाहीत अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. अशी अवस्था लातूर जिल्ह्यात आहे. ऊसतोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असून ऊसाची तोड होणार की नाही हा प्रश्न आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कार्यक्षेत्र तसेच लगतच्या भागातील ऊसाची तोड झाल्याशिवाय गाळप बंद करु नये असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. आता सगळ्याचे ऊस तोडले जाणार का हे लवकरच समजेल.
Share your comments