शेतकऱ्यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही

22 May 2019 07:26 AM


परभणी:
शेती व शेतकऱ्यांपुढे अनेक समस्‍या आहेत, या समस्‍या सोडविण्‍याकरिता शेतकऱ्यांना संघटीत होणे गरजेचे असुन गटशेती शिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बाजारातील शेतकऱ्यांची सौदाशक्‍ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या 47 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 18 मे शनिवार रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषि आयुक्‍त तथा महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक श्री. उमाकांत दांगट हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातुर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे आदींची प्रमु़ख उपस्थिती होती.

कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले पुढे म्‍हणाले की, आज पारंपारिक शेती किफायतशीर राहीली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल, अनेक तरूण आधुनिक शेतीकडे वळत आहेत, आजच्‍या शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानकडे ओढा वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परभणी कृषी विद्यापीठातील तुर, ज्‍वार, सोयाबीन आदी पिकांची वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहेत. येणाऱ्या वर्षात हवामान अंदाजाकरिता महावेध योजना राज्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येणार असुन त्‍यामुळे शेतकऱ्यांना अचुक हवामान अंदाज व कृषी सल्‍ला मिळणार आहे. कीड व रोग प्रादुभार्वाचा अचुक अंदाजाने पिक संरक्षण करण्‍यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. येणाऱ्या खरीप हंगामात मक्यावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळी, हुमणी आदी कीडीच्‍या व्‍यवस्‍थापनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

श्री. उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेती अर्थव्‍यवस्थेवरच अवलंबुन आहे. जागतिकरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतीक्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, परंतु आजही रोजगारासाठी 60 टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवरच अवलंबुन आहे. बदलत्‍या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या आधारेच शेती करावी लागेल.


अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतीपुढे अनेक प्रश्‍न आहेत, येणाऱ्या हंगामात विविध पिकांवरील कीडींच्‍या प्रादुभार्वाचे आव्‍हान शेतकऱ्यांपुढे राहणार आहे, परंतु या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषी विभाग शेतकऱ्यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ देईल. दुष्‍काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फळबागा अडचणीत आल्‍या, विशेषत: हलक्‍या जमीनीवरील मोसंबी बागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे हलक्‍या ते मध्‍यम जमीनीत डाळिंब, सिताफळ, एपल बोर आदी फळपिक शेतक-यांनी घ्‍यावीत. शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असलेला कापसाचा विद्यापीठ विकसित नांदेड-44 हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणाऱ्या खरीप हंगामात या वाणाचे बियाणे मर्यादित प्रमाणात महाबिज उपलब्‍ध करणार आहे. या वाणाचे बियाणे पुढील वर्षी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव व डॉ. अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकऱ्यांच्या मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच विद्यापीठ मासिक शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिका आदींचे विमोचन करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारीत दालनाचा समावेश असलेल्‍या कृषी प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

तांत्रिक सत्रात हुमणी कीड, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर लष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. बी. व्‍ही. भेदे, मोसंबी बागाचे कमी पाण्‍यात संरक्षण यावर डॉ. एम. बी. पाटील, कापुस लागवडीवर डॉ. अे. जी. पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ. यु. एन. आळसे, तुर लागवडीवर डॉ. एस. बी. पवार, हवामान अनुकूल शेतीवर डॉ. बी. व्‍ही. आसेवार, डॉ. एम. एस. पेंडके, ज्‍वार लागवडीवर डॉ. प्रितम भुतडा, रेशीम उद्योगावर डॉ. सी. बी. लटपटे, फळबाग लागवडीवर डॉ. शिवाजी शिंदे, कडधान्य पिक लागवडीवर डॉ. पी. ए. पगार आदींनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञांनी निरासरन केले. विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही करण्‍यात आले. मेळाव्‍यास व कृषी प्रदर्शनीस शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळाव्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
 

गटशेती group farming एकनाथ डवले Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ kharif खरीप नांदेड-44 Nanded-44 Bt Cotton बीटी कापूस Eknath Dawale
English Summary: Farmers have no option without group Farming

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.