शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल

Saturday, 18 January 2020 08:40 AM


मुंबई:
प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. त्यातून शेतकरी बांधवांना बाहेर काढू, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला.

शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात दुवा म्हणून कृषी विभाग काम करणार या संकल्पनेला आज मूर्त स्वरूप देत कृषिमंत्री भुसे यांनी राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी यांना आपले विचार, कैफियत, कृषी विकासासाठीच्या उपाययोजना मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद देत सुमारे 300 पेक्षा अधिक शेतकरी प्रतिनीधींनी सहभाग घेतला.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, कृषी तज्ञ किशोर तिवारी, अजीत नवले, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे, कृषी संचालक यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकरी उपस्थित होते.

गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना थेट कृषिमंत्री आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडता आल्या, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तुमचा भाऊ म्हणून मला व्यथा सांगा, त्या समजून घ्यायला अधिकाऱ्यांसमवेत येथे आलोय, असे आवाहन करून कृषिमंत्री म्हणाले, लहरी हवामानामुळे शेतीवर कायम संकट येते. शेतकरी आत्महत्या या अतिशय वेदनादायी असून त्या रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले. कृषी विकासाच्या योजना राबविताना त्या सकारात्मक पद्धतीने राबवण्यात येतील. वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आलोय त्यांच्या सूचना नक्कीच अमलात आणू, अशी ग्वाही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यभरातील शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतीसाठी विविध उपाययोजना सुचविल्या. प्रथमच झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनापर्यंत व्यथा पोहोचल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

dadaji bhuse दादाजी भुसे shetkari sanghtana शेतकरी संघटना प्रयोगशील शेतकरी Progressive Farmer pasha patel पाशा पटेल

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.