अलीकडे देशात जैविक शेती करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव प्रयत्नरत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. जैविक शेतीला चालना देण्यासाठी शासन दरबारी देखील अनेक वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. भारताची यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा व भारताचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी देखील जैविक शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याचे कार्य केले आहे.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने देखील संपूर्णता जैविक पद्धतीचा अवलंब करून लसणाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याचे मौजे वालसा डावरगाव येथील रहिवाशी शेतकरी भाऊसाहेब सांडू काळे या प्रगत शेतकऱ्याने रब्बी हंगामात जैविक पद्धतीचा अवलंब करीत लसणाची लागवड केली आहे.
भाऊसाहेब यांनी नुकत्याच काही दिवसापूर्वी हृदयाच्या आजारावर मात केली आहे, यादरम्यान त्यांना अनेक आहार तज्ञांनी तसेच डॉक्टरांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला सेवन करण्याचा सल्ला दिला. तेव्हा भाऊसाहेब यांना सेंद्रिय पदार्थ आहारात किती बहुमूल्य आहेत याची जाणीव झाली. आजारातून पूर्णतः बरे झाल्यानंतर, भाऊसाहेब यांनी पूर्णता जैविक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला.
भाऊसाहेब यांना एकूण तीन मुले आहेत, विशेष म्हणजे या प्रगत शेतकऱ्याचे तिन्ही मुले कृषी शाखेतील पदवीधर आहेत. सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलांचा देखील सह्योग लाभला, हळू हळू भाऊसाहेब यांनी रासायनिक खतांवर चे अवलंबित्व कमी करण्याचे ठरवले व सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याकडे आपला फोकस वळवला.
भाऊसाहेब यांनी आपल्या गावातच सेंद्रिय शेती उत्पादक नामक एक कंपनी स्थापन केली. यंदा मुबलक पाणी असल्याने व लसनाच्या शेतीसाठी अनुकुल वातावरण असल्याने भाऊसाहेब यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने एक एकर क्षेत्रात लसणाची लागवड केली.
यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. भाऊसाहेब यांना एक एकर क्षेत्रासाठी सुमारे 210 किलो गावरान लसणाचे बियाणे खरेदी करावे लागले होते. भाऊसाहेब यांच्या मते, त्यांना आत्तापर्यंत एक एकर क्षेत्रात पूर्णतः जैविक पद्धतीने लसणाची लागवड करण्यासाठी सुमारे 60 हजार रुपये खर्च आला आहे. तसेच भाऊसाहेब यांना आशा आहे की लसुन लागवडीतून त्यांना जवळपास 50 क्विंटल उत्पादन प्राप्त होईल.
Share your comments