उस्मानाबाद: राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव पीक पद्धतीमध्ये बदल करताना बघायला मिळत आहे, असाच काहीसा बदल मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात देखील शेतकरी बांधवांनी केला मात्र असे असले तरी अद्यापही बहुतांश शेतकरी पारंपारिक पिकाला प्राधान्य देताना दिसत आहेत. उस्मानाबाद समवेतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे ज्वारी एक मुख्य पीक आहे, बहुतांश शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. मराठवाड्यात बहुतांश शेतकरी ज्वारीची लागवड धान्यासाठी तसेच जनावरांना उत्कृष्ट चारा मिळतो म्हणून करत असतात. या पिकामुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. या दुहेरी फायद्यामुळे मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीकपद्धतीचे गणित कोलमडले होते तसेच रब्बीच्या पेरण्या देखील लांबनीवर पडल्या होत्या, मात्र सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी या रब्बीमध्ये ज्वारीची लागवड केली सध्या ज्वारीचे पीक पोटऱ्यात आले आहे. मात्र ज्वारीच्या या अवस्थेत ज्वारी पिकावर मावा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ज्वारीचे पीक बहरत असतानाच या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट घडू शकते असे सांगितले जात आहे. अशा अवस्थेत पिकावर रोगाचे सावट आल्याने औषध फवारणीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ सुनिश्चित झाली आहे. फवारणीसाठी देखील मराठवाड्यातील शेतकरी तयार आहेत मात्र ज्वारीची वाढ झाल्याने फवारणी करण्यासाठी अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. मराठवाड्यातील शेतकरी दरवर्षी ज्वारीची पेरणी झाली की अवघे दोन पाणी देऊन दर्जेदार उत्पादन प्राप्त करत असतात मात्र यावर्षी या हमीच्या पिकाला पहिल्यांदाच रोगांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी कधीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीला फवारणी केलेली नव्हती मात्र या हंगामात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना ज्वारीच्या पिकावर फवारणी करण्याची नामुष्की ओढावली आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीने त्राहिमाम् माजवला होता, त्यामुळे रब्बीचा पेरा देखिला लांबला. तसेच पेरणी झाल्यानंतर ही रब्बी हंगामात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या पिकाला मोठा फटका बसला. आता कुठेतरी संकटांची मालिका संपली असे शेतकऱ्यांना वाटू लागले होते. मात्र अवकाळी पावसाचे वातावरण निवळत नाही तोवरज्वारीच्या पिकावर मावा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट तर होणारच आहे मात्र पशुपालक शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचाही प्रश्न उभा राहणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्पादन खर्चात या हंगामात वाढ होऊन देखील पदरी किती उत्पादन पडते याबाबत शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत.
मराठवाड्यातील बहुतांश ज्वारीचे पिक हुरड्याचा अवस्थेत आहेत तर अनेक ठिकाणी ज्वारी पोटऱ्यात आहे. अशा अवस्थेत या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकातून कवडीमोल उत्पादन प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय ज्वारीच पिक पूर्ण वाढले असून फवारणी करण्यासाठी जमत नसल्याचे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या विभागातील शेतकरी ज्वारीतुन जेवढे उत्पादन मिळेल तेवढे पदरी पाडण्याच्या विचारात आहेत.
Share your comments