सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) गेल्या काही दिवसापासून विक्रमी आवक होत आहे; बाजार समितीमध्ये एवढी प्रचंड आवक होत आहे की बाजार समितीने आशिया (Asia) खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी लासलगाव बाजार समितीला (Lasalgaon Market Committee) देखील मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला होत असलेल्या तुफान आवकेमुळे सोलापूर बाजार समिती देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ (The largest onion market in the country) म्हणून उदयास आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्र समवेतच राज्यातील इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. विक्रमी कांदा आवक होत असल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला अद्यापपर्यंत तीन वेळा बाजार समितीच्या कांदा लिलावाला स्थगिती द्यावी लागली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या आवकेमुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेली प्रचंड आवक आता कांदा उत्पादक शेतकर्यांना गळफास देऊ पाहत आहे. कारण बाजारपेठेत होत असलेल्या विक्रमी कांदा आवक मुळे कांदा लिलाव बंद पाडला जातो, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या राज्यात खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी प्रगतीपथावर आहे. खरीप हंगामातील लाल कांदा काढणीसाठी तयार झाल्यास त्याला जास्त वेळ शेतात ठेवले जाऊ शकत नाही तसेच कांदा खांडणी झाल्यानंतर देखील खरीप हंगामातील (In the kharif season) लाल कांदा उन्हाळी कांद्याप्रमाणे साठवता येऊ शकत नाही. या कांद्याची साठवण क्षमता अल्प कालावधीची असल्याने जास्त काळ कांदा साठवल्यास कांद्याला कोंब येतात तसेच कांदा सडण्याची भीती देखील कायम असते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या याच समस्येला हेरून कांदा उत्पादक संघटनेने (Onion Growers Association) आक्रमक धोरण अवलंबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला खडे बोल सुनावले आहेत.
सलग दोन दोन दिवस बाजार समिती बंद ठेवल्याने बाजार समिती सुरू झाल्यानंतर अचानक आवक वाढते त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात मोठी कपात व्यापाऱ्यांद्वारे केली जाते. यामुळे सोन्यासारखा शेतमाल पिकवून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ शकते. त्यामुळे बाजार समितीने कांद्याची जास्त आवक होते म्हणून बाजार समिती बंद ठेवणे हे अनैतिक असून बाजार समितीने यासाठी ठोस उपाय योजना राबविणे अत्यावश्यक आहे. कांदा उत्पादक संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल बघून बाजार समितीला पत्राद्वारे कांदा लिलाव बंद ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष माननीय भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी जर बाजार समितीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर कांदा उत्पादक संघटनेला आक्रमक धोरनाचा अवलंब करावा लागेल असा देखील इशारा दिला आहे.
कांदा उत्पादक संघटनेच्या मते, बाजार समितीत होत असलेल्या प्रचंड आवक मुळे आधीच बाजारपेठेत मंदीसदृश्य वातावरण तयार झाले आहे. तसेच कांदा लिलाव दोन दिवस बंद केल्यामुळे बाजारपेठेतील लिलाव सुरू होताच कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी लगबग करतात परिणामी कांद्याच्या आवकेत अजूनच वाढ होते त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचा लिलाव दररोज सुरू राहणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच संघटनेने कांदा लिलाव दररोज सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कांद्याचा लिलाव सुरळीत व्हावा आणि होत असलेल्या प्रचंड कांद्याच्या आवकेची तातडीने विक्री करण्यासाठी अजून वाढीव जागेची व्यवस्था बाजार समितीने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची पूर्तता न केल्यास बाजार समितीच्या आवारात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.
Share your comments