शेतकऱ्यांना एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा शेतात काम करीत असताना एखादी इजा झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा कालावधी हा एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. ही योजना सात एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी दिली. या योजनेचे वैशिष्ट्य आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही संस्थेने कुठल्याही विमा कंपनीकडे हप्ता भरण्याची किंवा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत जे लाभ मिळतात ते स्वतंत्र असतात, परंतु महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र शेतकऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनांचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत पात्र ठरणार नाही, असे संबंधित जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा : पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्यांना कसा मिळतो लाभ, अनुदानबाबत काय आहेत नियम?
दुर्घटनेनंतर 45 दिवसांच्या आत संबंधित विमा दाव्याचा प्रस्ताव तयार करून तो तालुका कृषी अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. याबाबत अधिकच्या माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
काय आहे ही योजना
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत दोन लाखाचे विमा संरक्षण मिळते. तसेच अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. विमा दाव्याचा अर्ज करताना त्यासोबत विहित नमुन्यातील पूर्वसूचना अर्ज, तसेच आवश्यक कागदपत्रे जसे सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश व अन्य कोणत्याही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, वयाचा दाखला,6क,6ड आधी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
Share your comments