बाप आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी आपल्या स्वतःच्या स्वप्नांचा बळी देखील घेऊ शकतो, याचाच प्रत्यय समोर आला आहे अहमदनगर जिल्ह्यातून. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील एका अवलिया मुलाचे आपल्या देशाचा मान उंचावण्यासाठी वेटलिफ्टिंग मध्ये ऑलिंपिकच्या विश्वप्रसिद्ध स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करण्याच्या स्वप्नासाठी एका बापाने आपली सोन्यासारखी शेतजमीन विक्री केली आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे वडाळी येथील शेतकरी दिगंबर बायकर यांनी आपल्या वेटलिफ्टिंग चा खेळाडू असलेल्या आपल्या मुलाच्या सुवर्ण पदकाच्या स्वप्नासाठी आपली पाच एकर शेतजमीन विकली आहे.
या अवलिया बापाने आपल्या मुलाच्या खेळासाठी आत्तापर्यंत तब्बल साठ लाख रुपयांचा खर्च केला आहे, तसेच आगामी काळात त्याच्या सरावासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी आपली शेतजमीन विकल्याचे सांगितले जात आहे. आपल्या मुलाच्या सरावासाठी त्यांनी आपल्या घरीच एक व्यायाम शाळा देखील उभारली आहे.
मौजे वडाळी येथील गणेश बायकर हा पदवीनंतरचे लोणी काळभोर येथे शिक्षण घेत आहे. तो एमएचे शिक्षण घेत आहे. यासोबतच तो पुण्याच्या बालेवाडीत वेटलिफ्टिंग चा सराव करत आहे. बालेवाडीतील राष्ट्रीय क्रिडा प्रबोधनीत प्राध्यापक उज्वला माने यांच्या उत्स्फूर्त मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे गिरवीत आहे. गणेश याने 2020 मध्ये आयोजित खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तेव्हापासून गणेशने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा ध्यास मनी बाळगला आहे.
गणेश यांनी आत्तापर्यंत राज्यस्तरीय पाच सुवर्णपदक आपल्या झोळीत टाकले आहेत. याव्यतिरिक्त जिल्हा आणि तालुका स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याने नाना प्रकारची पदके कमावली आहेत. गणेश याने वेटलिफ्टिंग खेळात राज्यात आपला बोलबाला कायम केला आहे, त्याने पुणे युनिव्हर्सिटीचा बेस्ट वेटलिफ्टर चा पुरस्कार देखील आपल्या झोळीत टाकला आहे.
आपल्या दमदार कामगिरीमुळे वेटलिफ्टिंग खेळात त्याने आपले एक विशिष्ट स्थान प्राप्त केले आहे, आपल्या कामगिरीच्या जोरावरच तो आता आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन करू इच्छित आहे. आंतरराष्ट्रीय स्तराची बहुप्रतिष्ठित अशा ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला आपल्या देशासाठी वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक कमवायचे आहे. गणेशला मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती, कोरोणावर देखील गणेशने यशस्वीरीत्या मात करून यावर्षी विभागीय स्पर्धेत 263 किलो वेटलिफ्टिंग मध्ये वजन उचलले आहे. राष्ट्रीय पातळीवर राज्यासाठी अजून एक सुवर्णपदक प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने तो रोज सहा तास सराव करत असल्याचे सांगितले गेले.
वेटलिफ्टिंगच्या खेळासाठी गणेशला आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च आला आहे, अजूनही त्याला लाखो रुपये खर्च येत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी त्याची बहीण दरमहा दहा हजार रुपये गणेश ला पाठवत असते. त्याच्या बहिणी प्रमाणेच त्याच्या आई-वडिलांनी देखील आपल्या स्वप्नांचा बळी घेत गणेशचा सराव अजूनही कायम ठेवला आहे. गणेशच्या वडिलांच्या मते, "संपत्तीपेक्षा मुलाचे स्वप्न अति महत्वाचे आहे तसेच आपला मुलगा देशासाठी स्वप्न पाहत असल्याचा आनंद आहे. त्यामुळे मी आत्ता पाच एकर सोन्यासारखी शेत जमीन विकली आहे आणि अजूनही पाच एकर विकली गेली तरी देखील माझी तयारी आहे. माझी संपूर्ण शेत जमीन जरी विकली गेली तरी काही हरकत नाही मात्र माझ्या मुलाने ऑलिंपिकमध्ये देशाला सुवर्णपदक पटकावले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे"
Share your comments