कांदा हे एक प्रमुख नगदी पीक. शेतकरी राजा मोठ्या आशेने ह्या नगदी पिकाची लागवड करतात. कांद्याची लागवड महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र केली जाते. खरीप हंगामात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड हि राज्यात होते. पण गेल्या काही वर्षांपासून कांदा हा नेहमीच शेतकऱ्यांचा वांदा करत असतो, असे दिसून आले आहे. कांदा हे जरी एक नगदी पीक असले तरी याला बेभरोशाचे पीक म्हणून ओळखले जाते.
कांदा उत्पादक शेतकरी तर असे म्हणतात की कांद्यावर कोंबडीचा सुद्धा व्यवहार करू नये..! कांद्याच्या अनियमिततेचे असेच एक उदाहरण समोर आले आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जमिनीवर लाल कांदा लागवड केला होता. खरीप हंगामाचे मुख्य पीक म्हणुन या शेतकऱ्याने कांदा लागवड केली मात्र, हजारोंचा खर्च करून, देखील खरीप हंगामातील हा लाल कांदा पोसलाच गेला नाही. त्यामुळे आधीच हजारोंचा खर्च केला असल्याने अजून खर्चात वाढ होऊ नये, व रब्बी हंगामाच्या पेरासाठी आपले शेत रिकामे व्हावे म्हणुन या शेतकऱ्याने कांदाच्या उभ्या पिकात जनावरे चरायला बांधली.
खर्च हजारोंचा उत्पन्न मात्र शून्य
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनेक आसमानी तसेच सुलतानी संकटाणा सामोरे जावे लागले आहे. आष्टी तालुक्यातील कऱ्हे वडगाव येथील भगवान सांगळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील यावर्षी आसमानी संकटाचा सामना करावा लागला आहे. भगवान सांगळे यांनी दोन एकर वावरात मोठ्या कष्टाने आणि आषेने लाल कांद्याची लागवड केली, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे वावरात लावलेले कांदे हे जसे लावले तसेच राहिले, कांदा हा पोसलाच गेला नाही.
भगवान यांनी दोन एकर कांद्याच्या पिकातून केवळ 30 किलो कांदा विकला आणि त्यांना यातून फक्त 920 रुपये कमाई झाली. सांगळे यांनी चार महिन्यात कांदा पिकासाठी जवळपास 90 हजार रुपये खर्च केले, एवढा मोठा खर्च केला, चार महिने ह्या कांदा पिकासाठी मेहनत घेतली मात्र, यातून त्यांना काहीच मोबदला मिळाला नाही. म्हणुन सांगळे यांनी निदान जनावरांना तरी चरायला चारा मिळेल, म्हणुन कांदाच्या पिकात आपली जनावरे चरण्यासाठी सोडली.
Share your comments