Chalo Delhi Protest : चलो दिल्ली शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही हजारो शेतकरी शंभू सीमेवर उभे आहेत. आंदोलनस्थळी आता महिलाही शेतकऱ्यांच्या पाठीशी येऊन उभ्या राहिल्या आहेत. ही पंजाब, हरियाणाची सीमा आहे की भारत-पाकिस्तानची? स्वत:च्या देशात जाण्यासाठी हे सर्व घडत आहे, अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. तर शंभू बॉर्डरवर पोलीस प्रशासनाकडून काल (दि.१३) रोजी आंदोलकांवर पाण्याचा आणि अश्रुधुरांचा मारा करण्यात आला आहे. तरीही शेतकरी आपण कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगत आहेत.
शंभू सीमेवर महिलांनी पदभार स्वीकारला
कालच्या तुलनेत आज (दि.१४) अंबाला येथील शंभू सीमेवर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतकरी आंदोलनात पहिल्या दिवशी फक्त पुरुष शेतकरी होते. पण दुसऱ्यादिवशी पासून आंदोलनात महिला सहभागी झाल्या आहेत. काल रात्री येथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या मात्र तरीही शेतकरी मागे हटले नाहीत. आज या आंदोलनात महिलाही उभ्या राहिल्या आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्यासोबतच रबराच्या गोळ्याही आंदोलकांवर चालवण्यात आल्या आहेत. मात्र महिला शेतकऱ्यांचे सीमेवर येणे सुरूच आहे. शेतकरी नेत्यांवर विश्वास ठेवला तर काही कालावधीत मोठ्या संख्येने महिला शेतकरी या आंदोलनात उतरतील, असं चिन्ह आहे.
अंबाला सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती
अंबाला सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत एकीकडे सरकार चर्चेची भाषा करत आहे, तर दुसरीकडे सरकारला चर्चा करायचीच असेल तर थेट चर्चा करावी, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र येथे काल दुपारपासून सातत्याने शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे नळकांड्याचा मारा केला जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखू शकत नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, अंबालाच्या शंभू सीमेनंतर शाहबादमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कर्नाल, पानिपत आणि सोनीपतमध्येही फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकरी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे.
Share your comments