नागपूर: जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्तमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) डॉ.नितीन राऊत, आमदार अशोक चव्हाण, दिवाकर रावते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर मध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो आहे. राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरु होत आहे. राज्यातल्या माता-भगिनींच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद हे आमचं पाठबळ असून त्या शक्तीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.
अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार असून त्यांच्या प्रश्नांना कृतीतून उत्तरे देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Share your comments