महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही दिवसापासून खुपच अडचणीत सापडला होता. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले, शेतमालाला चांगला भाव न मिळाल्याने ह्या चिंतेत अजूनच वाढ झाली. पावसामुळे कापुस सोयाबीन, तसेच पपई व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण आता ह्या संकटातून शेतकऱ्यांना थोडीशी राहत मिळताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच प्रसन्न झाले आहेत. गेल्या महिन्याभरात पावसाने भाजीपाला पिकांची पुरती वाट लावून टाकली, पावसामुळे विशेषता टोमॅटो पिकाचे रेट हे खुपच पडले. आवक पाहिजे तेवढी बाजारात नव्हती तरीही टोमॅटो पिकाचे भाव हे काही वाढले नाहीत याउलट ते कमी झालेत. पण आता बाजारात टोमॅटो पिकाची आवक ही लक्षणीय कमी झाली आणि टोमॅटोचे भाव हे चांगलेच वाढलेत त्यामुळे शेतकरी राजा थोडा का होईना सुखावला/आनंदी झाला. दोन महिन्यापूर्वी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती खुपच वाईट होती अक्षरशः शेतकरी आपल्या सोन्यासारख्या मालाला रस्त्यावर फेकत होता पण आता परिस्थिती बदलली आणि टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. विशेषता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्याचा चांगला मोल मिळत आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी वाडी गावातील शेतकरी बाळासाहेब साखळकर हे तर दिवसाला हजारो रुपये कमवीत आहेत. बाळासाहेब यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केलेली आहे आणि ह्यातूनच त्यांना लाखोंचा फायदा होत आहे.
आधीच्या नुकसानाची ही आहे भरपाई
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे भाजीपाला पिकांची पूर्ण नासाडी झाली. थोड्यापार हाती आलेल्या मालाला देखील चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. पण अचानक सर्वांकडून भाजीपाला पिकाची आवक चांगलीच मंदावली ह्याचा परिणाम असा झाला की टोमॅटो समवेत सर्व भाजीपाला पिकांच्या भावात तेजी आली. सोलापूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या टोमॅटोला 1000 रुपये कॅरेट एवढा विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद गगनात माव्हतं नाही आहे. शेतकरी ही आमच्या नुकसानीची भरपाई आहे असे सांगत आहेत.
शेतकरी झालेत खुश
बाळासाहेबांनी बोलतांना सांगितलं की, त्यांना मिळत असलेल्या किमतीत समाधान आहे. आणि आता असाच भाव कायम राहील अशी त्यांना आशा आहे. बाळासाहेब दिवसाला तीस हजार रुपयापर्यंत कमवीत आहेत. त्यांना आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रातून जवळपास 9-10 लाख रुपये मिळण्याची आशा आहे. त्यांना आता पर्यंत 4 लाख रुपयांची कमाई झाली आहे आणि त्यांना आकडा वाढण्याची आशा आहे.
Share your comments