चंदीगड- कष्ट, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर अशक्यप्राय गोष्टी शक्य करता येतात हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. पंजाबच्या छोट्याश्या खेड्यातील शेतकऱ्याची लेक कमलप्रीत कौरने थाळीफेक प्रकारात टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया साधली. कमलप्रीतची विक्रमी खेळी अवघ जग डोळ्यात तेल घालून पाहत होते. मात्र, तेव्हा तिचे वडील शेताच्या कामात गुंतलेले होते.
काळ्या आईची सेवा करणारे वडील आणि ऑलिम्पिक मधून देशसेवेची मिसाल बनलेली मुलगी हे अस्सल देशप्रेमाचं नातं असल्याची भावना सोशल माध्यमातून व्यक्त झाली. कमलप्रीतच्या पात्रता फेरीतील कामगिरीनंतर क्रीडाप्रेमींच्या आशा दुणावल्या होत्या. पंजाबमध्ये कमलप्रीत कौरच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. मात्र, एका छोट्याश्या खेड्यात शेतात काम करत असलेल्या तिच्या वडिलांना याची कल्पना नव्हती. ज्यावेळी फोन वरुन कौतुकाचा वर्षाव सुर झाला. तेव्हा त्यांनी आपल्या घराकडे आनंदाने धाव घेतली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कमलप्रीतनं थाळी फेकीच्या पात्रता फेरीत इतिहास घडवला. पात्रता फेरीत विक्रमी थाळीफेक करणाऱ्या कमलप्रीतला मात्र अंतिम फेरीत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
बादल ते टोकियो:
पंजाबमधील श्री मुख्यार साहिब जिल्ह्यातील बादल या छोट्याश्या गावातून कमलप्रीत पुढे आली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही कमलप्रीतची कामगिरी उंचावली होती. मात्र, तिला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.कमलप्रीतचे वडील शेतकरी आहेत. रुढीजात परंपरांना फाटा देऊन तिच्या खेळासाठी प्रोत्साहन दिलं. क्रीडा अकादमीत प्रशिक्षणाला असलेल्या मुलीला दिवसाआड भेटायला जात. आपल्या मुलीला घरचं जेवण मिळावं म्हणून सायकलनं 30 किलोमीटरचा प्रवास करत. मित्रांकडून कर्ज घेऊन कमलप्रीतच्या प्रशिक्षणाचा खर्च वडिलांनी भागवला.
Share your comments