जळगाव : खानदेशात पावसाअभावी कांदा लागवडीला फटका बसला आहे. रोपांच्या दरातही घसरण झाली आहे. लागवड कमी होईल, अशी स्थितीदेखील तयार झाली आहे. कांदा रोपांचे दर गेल्या वर्षी गगनाला भिडले होते. एका १०० फूट बाय अडीच फुटाच्या सरीमधील रोपे आठ ते १० हजार रुपयात मिळत होती. यंदा दीड ते दोन हजार रुपयात १०० बाय अडीच फूट सरीमधील कांदा रोपे मिळत आहेत.
कांदा रोपवाटिका धुळ्यातील कापडणे, लामकानी, साक्रीमधील पिंपळनेर, जळगावमधील चोपडा भागात अडावद, धानोरा, यावलमधील किनगाव, डांभुर्णी आदी भागात आहेत. तसेच एरंडोल, धरणगाव, जळगाव भागातही कांदा रोपवाटिका आहेत. लागवडीनंतर अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे शिल्लक आहेत. त्यांची मिळेल त्या दरात विक्री शेतकरी करीत आहेत.कांदा लागवड यंदा १५ ते १६ हजार हेक्टरवर खानदेशात अपेक्षित होती. परंतु पाऊस सुरवातीपासून अनेक भागात नाही. यामुळे जलसाठ्यांना मुबलक पाणी नाही. वातावरण उष्ण आहे. पुढे मुरमाड, हलक्या जमिनीच्या भागात जलस्त्रोत आटू लागतील, अशी स्थिती आहे.
यामुळे सिंचनासाठी पाण्याची मोठी गरज असणार आहे. हलक्या, मुरमाड जमिनीत कांदा पिकाचे अनेकदा सिंचन करावे लागते.
दरम्यान, सध्या पाऊस नसल्याने दोन दिवसाआड सिंचन करावे लागेल. या स्थितीत शेतकरी लागवड कमी करीत आहेत. तसेच काहींनी फक्त कांदा रोपवाटिकांमधील रोपांची विक्री केली. रोपांची लागवड टाळली.
रोपवाटिका अधिक व लागवड कमी, अशी स्थिती झाली आहे. यामुळे रोपांच्या दरात घसरण झाली आहे. चोपडा, एरंडोल, धरणगाव भागात दर्जेदार रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. कांदा बियाण्याचे दर अधिक आणि रोपवाटिकांमध्ये कमी नफा, अशी स्थिती अनेक भागात आहे.
Share your comments